⚡देवगड ता.११-:
हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव, बाजारातील शेतमालाच्या दरातील घसरण व अनिश्चितता तसेच वाढलेला उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. या समस्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाला मराठा समाज, देवगड यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
याबाबत देवगड तालुका मराठा समाजाने निवेदनाद्वारे कळविले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा आंबा काजू बागायतदार व व्यापारी संघ यांच्या वतीने गुरुवार दिनांक १२ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे काढण्यात येणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चास मराठा समाज देवगडचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार असून या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी होत असलेल्या या आंदोलनाला मराठा समाज देवगडकडून पाठिंबा दर्शविण्यात आला असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हीच आमची भूमिका असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या निवेदनावर अविनाश सावंत, विजय कदम, प्रदीप सावंत, केदार सावंत, किसन सूर्यवंशी, प्रशांत शिंदे, शंकर पाटील, शरद परब आदींची नावे नमूद करण्यात आली आहेत. मराठा समाज देवगडच्या वतीने या आक्रोश मोर्चास सक्रिय पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देण्यात आले आहे.
आंबा बागायतदारांच्या आक्रोश मोर्चाला मराठा समाज देवगडचा जाहीर पाठिंबा. .
