⚡दोडामार्ग ता.१॰-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर घोटगेवाडी शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अंतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. दीडशे वर्षपूर्ती कडे वाटचाल करणारी दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद विद्या मंदिर घोटगेवाडी या शाळेने मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त केला. मा. गटविकास अधिकारी मा. गटशिक्षणाधिकारी ,मा. शिक्षण विस्तार अधिकारी मा केंद्रप्रमुख यांच्या समितीने दिनांक 19/01/2026 ते दि.23.01.2026 या कालावधीत शाळेचे मूल्यांकन केले.शाळेचे उत्तम व्यवस्थापन , गुणवत्ता, विद्यार्थी विकास ,शालेय वातावरण,सामाजिक दायित्व,नाविन्यपूर्ण उपक्रम इतर निकषानुसार शाळेची पडताळणी करण्यात आली.
घोटगेवाडी शाळा ही गुणवत्तेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय परीक्षा, डॉक्टर एपीजे कलाम प्रज्ञाशोध परीक्षा या गुणवत्ता विषयक स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने या शाळेचे विद्यार्थी यश संपादन करीत आले आहेत . राष्ट्रीय शिष्यवृत्ती, ग्रामीण शिष्यवृत्ती,इस्रो सहल ,नवोदय विद्यार्थी निवड यात शाळेची यशस्वी कामगिरी दिसून येते. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे 5 लाख रुपये शाळेला आर्थिक मदत देणगी स्वरूपात देऊन एक सुसज्ज हॉल,शालेय रंगरंगोटी करून शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी अनोखे योगदान दिले आहे. तसेच स्मार्ट टीव्ही, फॅन,कुकर ,शेगडी इ,भांडी,तबला पेटी इत्यादी वस्तुरूप देणग्या दिल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्या तील वैशिष्ट्यपूर्ण असा शाळेचा बक्षीस योजनेचा उपक्रम अनेक वर्षे राबविला जातो ग्रामस्थांनी शाळेकडे सुमारे 1 लाख 20हजार रुपये ठेव स्वरूपात रक्कम ठेवली असून त्याच्या व्याजातून मुलांना पारितोषिके दिली जातात. प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यात येते. हस्ताक्षर ,वाचन, वक्तृत्व,रांगोळी, कथाकथन श्लोक पाठांतर ,चित्रकला अशा व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या मासिक स्पर्धा आणि अन्य उपक्रम राबविले जातात.
क्रीडा स्पर्धेमध्ये सातत्याने समूहगीत स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत जाण्याची शाळेची परंपरा आहे. पालक सहकार्यातून शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे शाळा डिजिटल करण्यात आली असून मुले डिजिटल सुविधा हाताळण्यात पारंगत आहेत वीज, पिण्याचे पाणी,खेळाचे मैदान, स्वच्छतागृहे इत्यादी सुविधा सुसज्ज आहेत.शाळेत शालेय बँक हा अतिशय उत्तम उपक्रम राबविण्यात येऊन त्यातून मुलांना बचतीचे महत्त्व आणि बँकेचे प्रत्यक्ष कामकाज यांची ओळख करून दिली जाते.
यावर्षीपासून शाळेत गांडूळखत निर्मिती प्रकल्प सुरू करून त्याद्वारे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने परसबागेत पालेभाज्या उत्पादन करून पोषण आहारात दिल्या जातात.
शाळेत चार शिक्षक कार्यरत असून मुख्याध्यापकांचे योगदान फार मोठे आहे सर्व चारही शिक्षक व्यवस्थापन आणि अध्यापनात पारंगत असून मुलांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील आहेत. शिक्षक विद्यार्थी प्रिय आणि समाजप्रिय आहेत.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य मान. सरपंच मान. उपसरपंच आणि सर्व सन्मा. सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे मा.अध्यक्ष व सर्व सन्मा. सदस्य तसेच पालक सर्व ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे शाळेने प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे.
ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा उत्तम सहयोग असल्यास ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा’ कशी घडू शकते हे जि. प. विद्या मंदिर घोटगेवाडी शाळा याचे उत्तम उदाहरण आहे. मा.गटविकास अधिकारी, मा.गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी व मा. केंद्रप्रमुख यांनी शाळेचे विशेष अभिनंदन केले असून मा. शिक्षणाधिकारी मा.उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन खास अभिनंदन केले आहे
“दोडामार्ग तालुक्यात घोटगेवाडी जि.प. शाळेची चमक; ‘माझी शाळा सुंदर शाळा’त प्रथम”…
