रुपेश पावसकर:माणकादेवी शाळेत महिला दिन साजरा..
⚡कुडाळ ता.०८-: तालुक्यातील नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान आहे. भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांच्या ग्रामसंघाच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन नेरूर जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रुपेश पावसकर यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात शनिवारी (ता ७) सायंकाळी केले. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडू, चुनकाप इतर पदार्थ बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग भगिनी गीता गावडे यांचा सन्मान करण्यात आला.
उमेद अभियान अंतर्गत नेरुर येथील नारीशक्ती ग्रामसंघ माणकादेवी नेरुर यांच्यावतीने 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला येथील माणकादेवी शाळेत महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाले. यावेळी पंचायत समिती सदस्य दीप्ती नाईक, नेरुर सरपंच भक्ती घाडीगावकर, संगम प्रभाग संघ नेरूर अध्यक्ष सोनाली चव्हाण, सेंटर बँक ऑफ इंडिया नेरूर बँक अधिकारी हिमांशू आर्या, उज्वल कांबळी, पुष्पा वालावलकर, पुष्पलता म्हाडदळकर, प्रभाकर गावडे, अरुणा चव्हाण, ऋचा पावसकर, स्वप्नाली बुगडे, श्वेता मार्गी, प्रियदर्शनी गावडे, नेहा गावडे, प्रिया धर्णे, ग्रामस्थ, महिला, वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलताना श्री. पावसकर म्हणाले, आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. या पर्यटन जिल्ह्यात आपला नेरूर गाव विकासाकडे वाटचाल करत आहे. येथील कर्ली नदीवर जलक्रीडा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पावले टाकायची आहेत. यासाठी तुमची सर्वाची साथ महत्वाची आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तुमच्यामुळे अपक्ष उमेदवार निवडून आलो. तुमच्यामुळे माझे नाव राज्यात गेले. हे केवळ नी केवळ तुम्ही केलेल्या किमयेमुळे झाले आहे. ग्रामसंघाच्या सर्वागीण विकासासाठी तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे सागून आपल्या ग्रामसंघाचा कारभार हा पारदर्शक आहे. या ग्राम संघाच्या माध्यमातून अनेकांनी उद्योग क्षेत्राकडे वाटचाल केली हे कौतुकास्पद आहे असे सांगितले.
सरपंच भक्ती घाडी यांनी स्त्री शक्ती ही आदीशक्ती आहे सर्व स्त्रिया या सक्षम असतात. प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने वावरत आहे हे निश्चितच अभिमानास्पद आहे. बचत गटाचा विचार करता या गटातील महिलांना सक्षम करण्याचे काम उमेद ,बँका करतात हे कौतुकास्पद आहे असे सांगितले. दीप्ती नाईक यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माणकादेवी येथील सुमारे पंचवीस हून अधिक जेष्ठ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी गावडे यांनी केले. सन्मान कार्यक्रमानंतर महीला साठी संगीत खुर्ची घेण्यात आली. त्यातील विजेत्या तीन महीलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
दिव्यांग गीता गावडे व संजीवनी परब यांचा सन्मान
माणकादेवी येथील दिव्यांग भगिनी गीता गावडे ह्या स्वतः लाडू चुनकाप बनवून ऑर्डर घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात हे निश्चितच अतिशय कौतुकास्पद असून स्वतः दिव्यांग असून स्वतःच्या मेहनतीवर त्या काम करतात याबाबत सर्वांनीच गीता गावडे यांचे कौतुक केले. तसेच दुसऱ्या सत्कारमूर्ती संजीवनी परब या सुद्धा छोटा व्यवसाय करून आपले कुटुंब चालवितात. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दोघींचा झालेला सन्मान निश्चितच त्यांना उभारी देणारा असाच म्हणावा लागेल.
