मालवणच्या भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालयात पारंपारिक शिवजयंती उत्सव साजरा…

⚡मालवण ता.०६-:
मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवशंभू विचारमंच सिंधुदुर्ग’चे संयोजक तसेच ‘शिवराज भूषण’नाटकाचे निर्माते भूषण साटम यांनी शिवचरित्रावर विचार मांडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर नृत्य सादर केले. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा तसेच सरस्वती माता यांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य हणमंत तिवले यांनी प्रमुख व्याख्याते भूषण साटम यांचे स्वागत केले. प्रा. पवन बांदेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्र हितार्थ थोर पुरुषांचे असणारे बलिदान व भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा विशद केली.

यावेळी व्याख्याते भूषण साटम यांनी शिवचरित्रावर विचार मांडत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मातीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उभा केला तसेच शिवचरित्रामधून संकटांवरती मार्ग काढून मात करणे शौर्याचे आहे हे विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवले. कोणतेही काम छोटे नसून ते प्रामाणिकपणे व नीटनेटकेपणाने करणे गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. श्री.साटम यांनी मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला उभारणीची, हिरोची इंदुलकर यांनी केलेल्या कार्याची तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी तीन ऐतिहासिक दाखले देणाऱ्या घटनांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता परब व दिया गोलतकर या विद्यार्थिनींनी केले. आभार प्रा. गोसावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण वंदे मातरम गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page