युवकांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती होण्यासाठी युवा संसद महत्त्वाची…

डॉ. राजेंद्र मुंबरकर:कणकवली कॉलेजमध्ये ‘विकसित भारत युवा संसद २०२६’ उत्साहात संपन्न..

⚡कणकवली ता.०६-: युवकांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती होण्यासाठी युवा संसदसारखे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून युवकांनी ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेबाबतचे आपले विचार सरकारपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.

कणकवली कॉलेज येथे आयोजित “विकसित भारत युवा संसद-२०२६” या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते.

व्यासपीठावर कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, माय युवा भारत सिंधुदुर्गच्या कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर, डॉ. सुरेश पाटील, डॉ. किरण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भगवान लोके म्हणाले की, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून ती अधिक सशक्त करण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. विकसित भारत-२०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी नेतृत्व करत आपली मते ठामपणे मांडली पाहिजेत.

या प्रसंगी अपेक्षा मांजरेकर यांनी युवा कनेक्ट आणि माय युवा भारतच्या माध्यमातून युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. युवा संसद-२०२६ या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हाभरातून ४० हून अधिक युवकांनी सहभाग नोंदविला. यातून पार्थ कोळमकर, प्रणाली पवार, भार्गवी कवाटकर, प्राची परब आणि संचिता कारवडे यांची राज्यस्तरीय युवा संसद-२०२६ साठी निवड करण्यात आली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, निवडपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. डॉ. बालाजी सुरवसे, प्रा. विजय सावंत, संगीता साटम आणि ॲड. सुधीर गोठणकर यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी प्रा. वसीम सय्यद तसेच सर्व परीक्षक उपस्थित होते.

युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि संसदीय कार्य मंत्रालय यांच्या निर्देशानुसार क्षेत्रीय संचालक राष्ट्रीय सेवा योजना अजय शिंदे तसेच माय भारत सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग कणकवली कॉलेजतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यासाठी प्रा. सुरेश पाटील, डॉ. किरण जगताप, प्रा. सागर गावडे, प्रा. पूजा मुंज आणि प्रा. विद्या मारकड यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. पूजा मुंज यांनी केले, तर शेवटी आभार प्रदर्शन डॉ. किरण जगताप यांनी केले.

You cannot copy content of this page