पंचायतन देवस्थानचे पारंपरिक घुमट ढोलांच्या गजरात घरोघरी…
⚡सावंतवाडी ता.०५-: तालुक्यातील मळगाव येथे होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मळगाव पंचायतन देवस्थानचे पारंपरिक ‘घुमट’ काल बुधवारपासून ढोल-ताशांच्या गजरात गावातील प्रत्येक वाडीत घराघरांत फिरविण्यात येत आहे. या पारंपरिक सोहळ्यात गावचे राऊळ, गावकर मानकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. धार्मिक वातावरणात सुरू झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण मळगाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले असून या घुमट सोहळ्यामुळे मळगावातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मळगाव गावात होळीच्या तिसऱ्या दिवसापासून पंचायतन देवस्थानचे घुमट गावात फिरविण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेनुसार काल बुधवारपासून घुमट फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. ढोलांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या नादात गावातील प्रमुख मानकरी कुळ (राऊळ), थळ (गावकर), तसेच सावंत, पाडगावकर, जोशी तसेच गोसावी मठ आदी ठिकाणी सर्वप्रथम घुमट फिरविण्यात आला. नंतर गावातील इतर घरांमध्ये घुमट फिरविण्यास सुरुवात झाली.
अभंग-गौळणींच्या सुरांनी भक्तीरसाचा दरवळ
घुमटाच्या या सोहळ्यात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. यावेळी अभंग, गौळणी तसेच श्रीकृष्णावरील पारंपरिक पदे गायली जात असून त्यातून भक्तीचा सुरेल दरवळ पसरत आहे. या भक्ती गीतांमुळे आणि ढोलांच्या नादामुळे संपूर्ण मळगाव भक्तीरसात तल्लीन झाला आहे. मळगाव व सोनुर्ली देवस्थान एक असल्याने या परंपरेनुसार आज सायंकाळी घुमट सोनुर्ली येथे नेण्यात येणार आहे. तेथील धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित गावातील वाडीवाडीत उद्या घुमट फिरविण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानच्या मानकऱ्यांकडून देण्यात आली.
शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा सोहळा गावातील एकोपा, श्रद्धा आणि भक्तीचे उत्तम उदाहरण मानला जात असून दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो.
