जिल्ह्यात महसूल विभागाचे ७ मार्च रोजी महाराजस्व समाधान शिबिरे..

महसूल विभागाचे आयोजन:लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

ओरोस ता ४
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजन करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आठ तालुक्यांच्या ग्रामीण भागांत शनिवार ७ मार्च रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली वागदे येथे होणाऱ्या शिबिराच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री नितेश राणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या योजना, विविध दाखले यांचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
या शिबिर अभियानाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी बैठक सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी, ही समाधान शिबिरे जिल्ह्यातील ५७ मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. ७, १४ आणि २८ मार्च, १०, १७ आणि २४ एप्रिल तसेच ८, १५ आणि २२ मे या दिवशी शिबिरे आयोजित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ८ मे पासून नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत ही शिबिरे आयोजित करण्याचेही आदेश आहेत. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
७ मार्च रोजी सावंतवाडी तालुक्यात बांदा ग्रामपंचायत, वेंगुर्ला तालुक्यातील साई योगेश्वरी मंगल कार्यालय वेतोरे, दोडामार्ग तालुक्यातील साटेलो भेडशी गणपती मंदिर सभागृह, कुडाळ तालुक्यातील वालावल मंडळ कार्यालय, मालवण तालुक्यातील चौके हायस्कूल, कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायत, वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १, देवगड तालुक्यातील शिरगाव कॉलेज या ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यावेळी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असेही यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page