*कणकवलीत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡कणकवली ता.०४-: ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली येथील पदर महिला प्रतिष्ठानतर्फे विविध सांस्कृतिक, स्पर्धात्मक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना दैनंदिन धावपळीतून थोडा विरंगुळा मिळावा तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

शनिवार, दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता लक्ष्मी विष्णू हॉल येथे पाककला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी पालक व कोथिंबीर यापासून तयार केलेले पदार्थ घरी बनवून आणायचे आहेत. याच दिवशी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुली व महिलांच्या सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशक कावेरी कासरलकर उपस्थित राहून संवाद साधणार आहेत.

रविवार, दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये अश्विनी फॅशन डिझायनिंग यांचा फॅशन शो, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, एकपात्री अभिनय आणि ग्रुप डान्स यांचा समावेश आहे. यावेळी कणकवली शहरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

पाककला स्पर्धेसाठी दिशा अंधारी (मो. ९४२२९९७६६७) तर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रियाली कोदे (मो. ९४२०५२४२०३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमादरम्यान भरघोस बक्षिसांसह १० लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत.

महिला दिन उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page