पर्यटन महोत्सवावरून सभेत खडाजंगी..
कणकवली : कणकवली नगरपंचायतीचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ३ कोटी १ लाख ४१ हजार ४५७ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प शुक्रवारी नगरपंचायत सभेत सादर करण्यात आला. ५२ कोटी २४ लाख २७ हजार ६०० रुपयांच्या खर्चाचा हा अर्थसंकल्प असून एकूण अर्थसंकल्पीय तरतूद ५५ कोटी २५ लाख ६९ हजार ५८ रुपयांची आहे. चर्चेदरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या असून त्यांचा समावेश अंतिम अर्थसंकल्पात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या प. पू. भालचंद्र सभागृहात पार पडली.
यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील तसेच नगरसेवक रुपेश नार्वेकर, बाळू पारकर, दीपिका जाधव, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, संकेत नाईक, जयेश धुमाळे, लूकेश कांबळे, सुप्रिया नलावडे, बंडू हर्णे, राकेश राणे, संजय कामतेकर, स्वप्नील राणे, मेघा गांगण, मेघा सावंत, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत आदी उपस्थित होते.
महसूल व खर्चाचा ताळेबंद
नगरपंचायतीकडे प्रारंभी शिल्लक रक्कम ११ कोटी ८४ लाख ५७ हजार १३७ रुपये आहे. महसुली व भांडवली जमा ४३ कोटी ४१ लाख ११ हजार ९२० रुपये अपेक्षित असून प्रारंभीच्या शिल्लकीसह एकूण जमा ५५ कोटी २५ लाख ६९ हजार ५८ रुपये होणार आहेत.
महसुली व भांडवली खर्च मिळून एकूण खर्च ५२ कोटी २४ लाख २७ हजार ६०० रुपये अपेक्षित आहे. परिणामी एकूण जमा रकमेतून खर्च वजा जाता ३ कोटी १ लाख ४१ हजार ४५७ रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे.
नगरसेवकांनी सुचविलेल्या नव्या तरतुदींमुळे शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व विविध विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पर्यटन महोत्सवावरून रंगले शाब्दिक वाक्युद्ध
बजेट सभेदरम्यान नगराध्यक्ष संदेश पारकर आणि विरोधी स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांच्यात रंगलेल्या शाब्दिक चकमकीमुळे संपूर्ण सभा गाजली. सभेच्या सुरुवातीपासूनच वातावरण तापलेले पाहायला मिळाले.
लेखापालांनी मांडलेल्या अंदाजपत्रकातील विविध मुद्द्यांवर बंडू हर्णे यांनी जोरदार आक्षेप घेतला. नगरपंचायतीतील एकूण नगरसेवकांपैकी दहा नगरसेवक नवीन असताना घाईगडबडीत सभा आयोजित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सभागृहाला शांत राहण्याची व एकमेकांचे म्हणणे समजावून घेण्याची विनंती केली.
नगरसेविका आर्या राणे यांनी वृक्षकर आणि शिक्षणकरातून जमा होणारा निधी नेमका कुठे खर्च केला जातो, असा थेट सवाल उपस्थित केला. त्यानंतर पर्यटन महोत्सवासाठी बजेटमध्ये दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या तरतुदीला नगरसेवक मेघा गांगण, बंडू हर्णे आणि सुप्रिया नलावडे यांनी तीव्र विरोध दर्शविला.
जनतेकडून विकासकामांसाठी दहा टक्के लोकवर्गणी अपेक्षित असताना आणि नगरपंचायतीची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात असताना दहा लाख रुपयांची तरतूद कशासाठी, असा सवाल हर्णे यांनी उपस्थित केला. सुप्रिया नलावडे यांनी मागील पाच वर्षांच्या अंदाजपत्रकात अशा प्रकारचा निधी खर्च झालेला नसल्याचा मुद्दाही मांडला.
यावर उत्तर देताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी, जनतेच्या सोयीसाठी पर्यटन महोत्सव आयोजित केला जात आहे. “तुम्ही दहा लाख रुपये उभे करून दिलेत तर नगरपंचायतीच्या निधीला हात लावणार नाही,” असे सांगत विकासकामांसाठी लागणारी दहा टक्के लोकवर्गणी भरण्यात नगरपंचायत कमी पडणार नाही, असे स्पष्ट केले. डिसेंबर किंवा एप्रिल महिन्यात पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पारकर यांनी सुरू केलेले बोटिंग प्रकल्प व पर्यटन केंद्र बंद पडल्याचा आरोप हर्णे यांनी केला. त्यावर हे प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येतील, तसेच विरोधकांनी सुरू केलेला धबधबा प्रकल्पही बंद पडू दिला जाणार नाही, असे पारकर यांनी स्पष्ट केले.
एकंदरीत सत्ताधारी व विरोधकांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे कणकवली नगरपंचायतीची अर्थसंकल्पीय सभा चांगलीच गाजली.
