⚡मालवण ता.१३-:
मालवण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा माजी एनसीसी कॅडेट बाजीराव शंकर काळे याने समाजातील वंचित घटकांसाठी आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाजीराव काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातून समाजसेवेच्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या २१ तरुणांची या सत्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये कोकणातून केवळ तीन युवकांची निवड झाली. ज्यामध्ये बाजीराव काळे यांचा समावेश असणे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि मालवण तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.
बाजीराव काळे सध्या ‘अनुगामी लोकराज्य महाभियान’ अंतर्गत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका मोठा असून त्यांनी विविध क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ‘संविधानाची ७५ वर्षे’ या उपक्रमांतर्गत ५६ शाळांमधील १०,५०० विद्यार्थ्यांपर्यंत संविधानाचे मूल्य पोहोचवले आणि १०० हून अधिक व्याख्याने दिली. अनाथ व एकल पालकांच्या मुलांना ‘बालसंगोपन योजना’ मिळवून दिली, तर तरुणांना स्वयंरोजगारासाठी सरकारी महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून दिले. महाकुंभ तीर्थ दर्शन आणि ‘गुरु वंदना’ सारख्या कार्यक्रमांतून समाजात सद्भाव आणि गुरु-शिष्य नाते दृढ करण्याचा प्रयत्न केला. बाजीराव काळे यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मोलमजुरी करून त्यानी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असताना त्याने एनसीसी विभागात ‘सीनियर’ म्हणून जबाबदारी पार पाडली. “एनसीसीमुळेच माझ्यात नेतृत्वगुण आणि शिस्त विकसित झाली,” असे बाजीराव काळे सांगतो.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग कॉलेजचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत आणि प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी तसेच कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण आणि सर्व संचालक, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, तहसीलदार गणेश लव्हे, ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेकर, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक आणि सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर यांनी बाजीराव याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
