न. प. च्या विशेष सभेत आग्रही मागणी :वाढीव रुंदीचे रस्ते, गायब झालेले ओहोळ, पूररेषा हे डीपी प्लानचे कळीचे मुद्दे..
कुडाळ : शहराच्या विकास आराखड्यात २७ ठिकाणी आरक्षण दाखवण्यात आली आहेत आणि त्यासाठी तब्बल २५६ हरकती नगर पंचायतीकडे आलेल्या आहेत. आरक्षणात दाखवण्यात आलेले रस्ते, नसलेले ओहोळ, ग्रीन झोन, पूररेषा याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. हीच लोकांमधील नाराजी आज नगर पंचायत मध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दिसून आली. उपस्थित सर्वच नगरसेवकांनी या विकास आराखड्याबाबत नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हरकती नोंदवण्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून द्या, अशी मागणी सभागृहाने केली. तसेच याबाबत संयुक्त बैठक लावण्याची मागणीसुद्धा करण्यात आली असून नागरिकांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका नगर पंचायत घेणार नाही अशी ग्वाही नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.
कुडाळ शहराच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आज सर्व नगरसेवकांची विशेष सभा नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत सभागृहात झाली. हा विकास आराखडा २०२२ मध्ये टाऊन प्लॅनिंग कार्यालयाने ऍपेक्स कंपनी कडून २०२२ मध्ये करून घेतला, अशी माहिती सुरुवातीलाच सभेसमोर आली. सध्या हा विकास आराखडा हरकतींसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे आराखड्यात २७ ठिकाणी आरक्षणे आहेत. त्यावर तब्बल २५६ हरकती आलेल्या असल्याची माहिती सभेत देण्यात आली. जास्तीतजास्त हरकती या रस्त्याच्या वाढीव रुंदीवर आहेत.
कुडाळचा जो मुख्य रस्ता आहे तो २४ फुटी करण्यात येणार आहे. त्यावर बऱ्याच जणांनी हरकती घेतल्या आहेत. तसेच बरेच अंतर्गत रस्ते सुद्धा १५-१५ आणि १२-१२ फुटांचे ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये लोकांची घरे, मालमत्ता जाणार असल्याने त्याला हरकती आलेल्या आहेत. त्यावर साऱ्याच नगरसेवकांनी आक्षेप घेतला.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुडाळ शहरातील बरेचसे ओहोळ गायब झाल्याचे या आराखड्यात दिसते आहे. ते ओहोळ गेले कुठे असा सवाल सगळ्याच नगरसेवकांनी केला. असलेले ओहोळ तरी आराखड्यात दाखवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ओहोळाच्या बाजूला बांधकामासाठी परवानग्या दिल्या तर ओहोळ बुजवून बांधकामे केली जातील असा देखील मुद्दा सभेत चर्चेत आला. ७५ टक्के ओहोळ आराखड्यातून गायब असल्याचा धक्कादायक खुलासा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केला.
गोधडवाडीत घनकचरा प्रकल्पसाठी आरक्षण दाखवण्यात आले आहे. पण नगर पंचायतचा घनकचरा प्रकल्प होत असताना आणखी हे आरक्षण कशाला असा प्रश्न सभेत उपस्थित करण्यात आला. नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तर विकास आराखड्यात जेवढ्या त्रुटी आहेत त्या सर्वांचे वाचन करून सभागृहाचे लक्ष वेधले.
नदीकिनारच्या बऱ्याच जागेवर ग्रीन झोन टाकण्यात आला आहे. पण अशाच नदीकिनारच्या छोट्याशा जागेवर मध्येच कमर्शियल झोन दाखवण्यात आला आहे. तो का दाखवला आहे, असा सवाल गटनेते विलास कुडाळकर यांनी केला. तसेच त्यासाठी जो २४ मीटर रस्ता दाखवण्यात आला आहे तास दाखवता येतो का असा प्रश्न अभिषेक गावडे यांनी विचारला.
पूररेषेबाबत सुद्धा सभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडली. पाटबंधारे विभागाने रेड आणि ब्लु रेषा निशिचीत करताना चुकीचा निकष लावल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
एकंदरीतच हा काही हरकती या प्रशासनाच्या वतीने सुद्धा घेण्यात येतील असं मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले. मच्छिमार्केट साठी आरक्षण नसले तरी नगर पंचायतीच्या ताब्यात मच्छीमार्केटसाठी जागा उपलब्ध आहे. ते निदर्शनाला आणले जाईल. तसेच ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि पार्किंग साठी जागेची मागणी केली जाईल. नाट्यगृहाशेजारची मोकळी जागा नगर पंचायतीची आहे ती आरक्षणात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेवर गार्डन होईल. नदीकिनारी महापुरुष मंदिर ठिकाणी बोटिंगची व्यवस्था करण्यात येईल. पोलीस स्टेशन समोरची नानानानी पार्कची जागा आरक्षणात घेण्यात येईल. अशा प्रकारे प्रशासन म्हणून सुद्धा सूचना केल्या जातील असे श्री. औंधकर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एकंदरीतच गरज नसताना वाढीव रुंदीचे केलेले रस्ते, गायब झालेले ओहोळ, पूर रेषेबाबतची गोंधळाची स्थिती, ग्रीन झोन मध्ये आरक्षित केलेला कमर्शियल झोन अशी अनेक मुद्द्यांवर या विशेष सभेत वादळी चर्चा झाली. रस्ते रुंद केले तर लोकांची घरे जाणार त्याचे काय, ओहोळ का गायब करण्यात आले? ज्या खासगी ऍपेक्स कंपनीने हा आराखडा बनवला त्यांनी कशाच्या आधारे हा आराखडा बनवला, असे अनेक मुद्दे आज या सभेत चर्चेत आले. त्यामुळे हरकती आणि विचारविनिमय करण्यासाठी मुदत वाढ आणि संयुक्त बैठक असे पर्याय सुद्धा सुचवून तशी मागणी करण्यात आली.
