बांदा येथे काजू उत्पादकांसाठी ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण शिबीर उत्साहात…

⚡बांदा ता.१३-: सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग व आत्मा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्तम कृषी पद्धतीबाबतचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले. संतोषी माता मंगल कार्यालयात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात काजू उत्पादन वाढ, किड व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य काजू बोर्डचे संचालक डॉ. परशुराम पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, मॅग्नेट प्रकल्पाचे विभागीय उपसंचालक मिलिंद जोशी, पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, बांदा सोसायटीचे चेअरमन राजाराम सावंत, सिंधुदुर्ग फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास सावंत, कृषी अधिकारी अनिकेत कदम, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांनी केले. डॉ. परशुराम पाटील यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच बाजारपेठेतील स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या काजू पुनरुज्जीवन योजनेसह इतर विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मॅग्नेट प्रकल्पाचे कृषी व्यवसाय तज्ज्ञ ज्ञानेश्वर खेडेकर यांनी मॅग्नेट प्रकल्पाची माहिती देताना शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी संस्थांसाठी प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध घटकांची माहिती दिली.
कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढविणे आवश्यक असून महिलांना संधी व मार्गदर्शन मिळाल्यास शेतीपूरक व्यवसायात मोठी प्रगती साधता येईल, असे मत मॅग्नेट प्रकल्पातील तज्ज्ञ प्रीती जोशी यांनी व्यक्त केले. बँक ऑफ इंडियाचे कृषी अधिकारी राजाराम परब यांनी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेल्या पतपुरवठा सुविधांची माहिती दिली. दरम्यान, काजू पिकावरील किडींच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना, कीड ओळख व व्यवस्थापन याबाबत आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज यांनी मार्गदर्शन केले. उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे यांनी काजू उत्पादन वाढीसाठी योग्य कृषी पद्धती स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
काजू बी आयात-निर्यात, विक्री व्यवस्थापन व बाजारपेठेतील संधी याबाबत सल्लागार व काजू विक्री तज्ज्ञ ऋषिकेश परांजपे यांनी सखोल मार्गदर्शन केले. आत्मा कमिटी सावंतवाडीचे अध्यक्ष विलास सावंत यांनी शासनाच्या काजू उत्पादकांसाठी असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच विभागीय उपसंचालक मिलिंद जोशी यांनी मॅग्नेट प्रकल्पाच्या पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बांदा मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईंबर, उपकृषी अधिकारी अजमुद्दीन सरगुरू, मनाली परब, सहाय्यक कृषी अधिकारी रसिका वसकर, पल्लवी सावंत, मिलिंद निकम, वैभव ननवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो:-
बांदा येथे प्रगतशील काजू बागायतदार दिवाकर मावळणकर यांचा सत्कार करताना मान्यवर.

You cannot copy content of this page