स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगा – अंजली कुलथे

बॅ नाथ पै नर्सिंग कॉलेजमध्ये नवप्रवेशीत नर्सेसना शपथ..

⚡कुडाळ ता.११-: माणूस जेव्हा दुसऱ्यासाठी काही करतो, तेव्हा त्यातला आत्मिक आनंद अवर्णनीय असतो. म्हणून स्वतःसाठी जगताना इतरांसाठी जगा. त्याद्वारे आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. त्यांचे आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा तुमच्या कठीण काळात उपयुक्त ठरतील. नर्सिंग क्षेत्र ही अशी एक संधी आहे की यात अनेक आकस्मिक घटनांना सतत सामोरे जावे लागते. यावेळी समर्पण वृत्तीने सेवा देण्यास तयार असते पाहिजे, असे उद्गार मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात कामा हॉस्पिटल मधील 20 गरोदर मातांसहित 20 गर्भातील बालकांचे प्राण वाचवणाऱ्या सिस्टर अंजली कुलथे यांनी काढले. कुडाळ येथील बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या नूतन नर्सेसच्या शपथ ग्रहण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
बॅ.नाथ पै नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दिली जाणारी शपथ आणि हा शपथ ग्रहण सोहळा व लॅम्प लाइटिंग सोहळा अतिशय दर्जेदार, शिस्तबद्ध व अतिशय दिमाखदार आहे. हा एक पवित्र क्षण असलयाचे सांगून याच्या रेखीव आयोजनाबद्दल संस्थाचालक उमेश गाळवणकर व नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी व त्याच्या सर्व सहकारी स्टाफचे त्यांनी अभिनंदन केले.
नर्सिंग पेशांमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की आपण या पेशातून मानवाची सेवा करताना परमेश्वराच्या सेवेच्या मार्गावर आहात. ही अभिमानास्पद गोष्ट माना. या क्षेत्रामध्ये वेदनायुक्त व दुःखी रुग्णांची सेवा करणे ही सोपी गोष्ट नाही. त्याला धैर्य आणि समर्पण वृत्ती महत्त्वाची आहे. रुग्ण वेदनामय जीवन जगत असताना आपल्याकडून प्रेम, माया, सहानुभूती व उत्तम शुश्रुषेची अपेक्षा करत असतात. त्यांना आपल्या समस्या विसरून, आपल्या परिवारातला एक घटक मानून उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करा. असे सांगत शुभेच्छा दिल्या
यावेळी त्यांनी 26 /11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये कामा रुग्णालयातील 20 गरोदर मातांना अतिरेक्यांच्या तावडीतून वाचविण्याचा दहा बाय दहाच्या अंधाऱ्या खोलीमध्ये 20 माताना कोंबून त्यांना वाचवितानाचा आपला चित्तथरारक अनुभव उपस्थिताना कथन केला. आजूबाजूला गोळ्यांचा वर्षाव होत असताना, जीवाची पर्वा न करता जखमी सहकाऱ्यांचे व गरोदर मातांचे प्राण वाचविले. हे नर्सिंग पेशातील या युनिफॉर्ममुळेच आपल्याला ही मोठी ताकद मिळाल्याचे नमूद करीत त्या युनिफॉर्मचा सन्मान करा. दुसऱ्याची सेवा करायला आपण मनापासून तयार असाल तर काहीही चांगले होऊ शकते. आणि जगातील सर्वात मोठ्या धर्माचे, सेवाव्रताचे आपण पाईक व्हा, अस आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर उमेश गाळवणकर, त्यांचे आई-वडील, डॉ. संजय निगुडकर उभयता, तसेच नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, उपप्राचार्य वैशाली ओटवणेकर, बॅ. नाथ पै कला,वणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बॅ.नाथ पै फिजीओथेरपीची प्राचार्य डॉ. प्रत्ययुष रंजन बिस्वाल, संस्थासाल्लागार पल्लवी कामत, सायली वारंग इत्यादी उपस्थित होते.
उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, अंजली कुलथे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. पुढच्या सर्व स्पर्धेच्या युगात व धकाधकीच्या जीवनात आपले काम उत्तरोत्तर कसे दर्जेदारपणे वाढवत न्यावयाचे उत्तम उदाहरण म्हणजे अंजली कुलथे आहेत. नर्सिंग पेशामध्ये राहून सुद्धा समाजाची कशी सेवा करता येते, धीरोदात्तता कशी राखता येते आणि प्रसंगवधान राखून कसे इतरांचे प्राण वाचवु शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंजली कुलथे मॅडम आहेत. त्यामुळे परिचारिका हा फक्त व्यवसाय नसून ते व्रत आहे. ते प्रामाणिकपणे जपा. रुग्णांना प्रेम भावनेने जपा. पुढचा काळ हा स्पर्धात्मक आहे त्यामुळे समाजात वावरताना नीतिमूल्य जपा. समाजात कुटुंबात संवाद साधा व आयुष्यातील सर्व आव्हानांना निर्भीडपणे सामोरे जा. असे सांगत शुभेच्छा दिल्या.
यावेळी सीनियर नर्सेसच्या प्रशिक्षणार्थ्यांकडून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना दिवा-दिव्याने पेटत असे हा संदेश दीपप्रज्वलनातून व ‘ओम सच्चिदानंद परब्रम्ह…’ यासुमधूर मंत्र गीताच्या साथीने त्यानां देत शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुमन करंगळे – सावंत यांनी तर प्राचार्य कल्पना भंडारी यांनी नर्सिंग प्रशिक्षणार्थी विद्यार्थी- विद्यार्थिनींना शपथ दिली. आणि नर्सिंग महाविद्यालयाचा उंचावत्या आलेखाचे अहवाल वाचन प्रा. वैशाली ओटोवणेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार व कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.प्रणाली मयेकर यांनी केले .
यावेळी नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे पालक, व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page