आचरा येथील मच्छिमार राड्यातील ९३ पारंपारिक मच्छीमारांची निर्दोष मुक्तता…

दहा वर्षानंतर पारंपारिक मच्छिमारांना दिलासा..

⚡मालवण ता.२९-:
दहा वर्षापूर्वी आचरा येथे अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपारिक मच्छिमारांनी पुकारलेल्या आंदोलनावेळी झालेल्या राड्यात गुन्हे दाखल झालेल्या मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, धर्माजी आडकर, आकांक्षा कांदळगावकर, अन्वय प्रभू, रश्मिन रोगे, सन्मेष परब यांच्यासह
९३ संशयितांची सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पारंपारिक मच्छिमारांच्या वतीने ऍड.उल्हास कुलकर्णी तसेच सहाय्यक ऍड.प्राची कुलकर्णी व ऍड.अमेय कुलकर्णी
यांनी बाजू मांडली. या निर्दोष मुक्ततेमुळे सदर पारंपारिक मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

श्रमिक मच्छिमार संघ,आचरा बंदर मच्छीमार संघटना व जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार यांनी आचरा बंदर येथे अनधिकृत पर्ससीन मासेमारी बाबत ३० ऑक्टोबर २०१६ रोजी मत्स्य विभाग विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आचरा येथे पारंपारिक मच्छिमार व पर्ससीन मच्छिमार अशा गटांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये पारंपारिक मच्छीमार यांच्यावर खुनाचा प्रयत्न,जबरी मारहाण, दरोडा, शासकीय कामात अडथळा (भा.द.वि.क.३०७/३९५/३२६/३२५/३५३/३३२/३३३/४५२/४३६/३३७/४२७/१४३/१४७/१४८/१४९/५०४/५०६) वैगरे गुन्हे दाखल झाले होते. या संघर्षाची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन,मासेमारी कायद्यामध्ये मोठे बदल केले होते. सदर प्रकरणात महिलांवर देखील गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये पारंपारिक मच्छीमार यांचे नेतृत्व करणाऱ्या रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, धर्माजी आडकर, आकांक्षा कांदळगावकर, अन्वय प्रभू , रश्मिन रोगे, सन्मेष परब यांच्यासह ९३ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील पारंपारिक मच्छीमार यांनी मालवण येथे जेलभरोचा इशारा देत व्यापक आंदोलन केले होते.

सन २०१६ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्याकामी जिल्हा सत्र न्यायालय,ओरोस येथे (नियमित खटला क्रमांक ४३/२०१६) गेली दहा वर्षे खटला चालू होता. मालवण येथील ऍड.उल्हास कुलकर्णी यांनी पारंपारिक मच्छिमारांच्या वतीने भक्कम बाजू मांडली. त्यांना मदतनीस म्हणून ऍड.प्राची कुलकर्णी व ऍड.अमेय कुलकर्णी यांनी काम पाहिले. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.

दहा वर्षानंतर जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यामुळे गुन्ह्यात आरोपी असलेल्या सर्व पारंपारिक मच्छीमार यांना योग्य न्याय मिळाला, असे मत ऍड.उल्हास कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या निर्दोष मुक्ततेमुळे पारंपारिक मच्छिमारांना दिलासा मिळाला असून सर्व पारंपारिक मच्छीमार संघटना यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत, अशी माहिती मच्छिमार नेते रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी दिली.

You cannot copy content of this page