सोनवडे तर्फ हवेली येथील श्री देवी आर्यादुर्गा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न…

⚡मालवण ता.२९-:
सोनवडे तर्फ हवेली येथील श्री देवी आर्यादुर्गा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि श्री देव लिंगेश्वर व श्री आर्यादुर्गा देवी यांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात तसेच भक्तिमय वातावरणात पार पडला

कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ हवेली येथील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री देवी आर्यादुर्गा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा होमहवन व इतर धार्मिक कार्यक्रमानी साजरा झाला. सकाळी ९ वा. ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर मंदिराकडून ढोल ताशांच्या गजरात आणि सनईच्या मंजुळ स्वरात, फटाक्यांच्या आतषबाजीत देव तरंग पालखीसह सोनवडे गावचे मानकरी आणि रयतेला साथीला घेत आर्या दुर्गा मंदिराकडे रवाना झाले. सकाळी दहा वाजल्यापासून सोनवडे गावच्या रहाटीतील प्रमुख देवता श्री आर्यादुर्गा देवी मंदिरात देवस्थानचे मानकरी श्री महीपाल धुरी आणि सौ. तारिका महीपाल धुरी या दाम्पत्याच्या हस्ते धार्मिक विधीना प्रारंभ झाला. पुरोहित विनायक भागवत, महेश वायंगणकर, सतीश भागवत यांच्या उपस्थितीत होमहवन लघुरुद्र व इतर कार्यक्रम पार पडले. तर दुपारी या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

दुपारच्या सत्रात प. पू. सद्गुगुरू वामनराव पै परिवार जीवनविद्या मिशन यांच्या वतीने हरिपाठ, उपासना व यज्ञ तसेच सुनील पालव यांचे जीवनविद्या व नामस्मरण या विषयावर प्रवचन पार पडले. सायंकाळी ७ वा. स्थानिक भजनांचा कार्यक्रम झाल्यानंतर सुरेश रणसिंग मित्रमंडळ गुढीपूर पिंगुळी यांचा पारंपारिक कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सोनवडे ग्रामस्थांबरोबरच मुंबईसह इतर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page