देवगडमध्ये अर्ज माघारीनंतर राजकीय चित्र स्पष्ट ; भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध, थेट लढती ठरल्या..
⚡देवगड ता.२७-: देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक मतदारसंघांत बिनविरोध निकाल लागले असून उर्वरित ठिकाणी थेट लढती निश्चित झाल्या आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेत चार तर पंचायत समितीत सहा अशा एकूण दहा जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत.
जिल्हा परिषद स्तरावर पडेल, बापर्डे, पोंभुर्ले आणि किंजवडे या चार मतदारसंघांत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. पडेल (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून सुयोगी रविंद्र घाडी, बापर्डे (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून अवनी अमोल तेली, पोंभुर्ले (ना.मा.प्र महिला) मतदारसंघातून अनुराधा महेशकुमार नारकर तर किंजवडे (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून सावी गंगाराम लोके यांची थेट निवड झाली आहे.
पंचायत समिती स्तरावर भाजपला सहा जागांवर बिनविरोध यश मिळाले आहे. पडेल (सर्वसाधारण)i मतदारसंघातून अंकुश यशवंत ठूकरूल, नाडण (सर्वसाधारण) मतदारसंघातून गणेश सदाशिव राणे, बापर्डे (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून संजना संजय लाड, फणसगांव (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून समृद्धी संतोष चव्हाण, शिरगांव (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून शितल सुरेश तावडे आणि कोटकामते (ना.मा.प्र महिला) मतदारसंघातून ऋतुजा राकेश खाजणवाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शिरगांव (अनुसूचित जाती) मतदारसंघात चुरशीची बहुपक्षीय लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे देवदत्त दामोदर कदम, शिवसेना (उबाठा)चे अभिषेक वसंत कदम, अपक्ष उमेदवार प्रणय मनोहर चांदोस्कर, मनसेचे सदानंद धोंडू शिरगांवकर आणि वंचित बहुजन आघाडीचे मंगेश धर्मराज जाधव हे उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद पुरळ (सर्वसाधारण) मतदारसंघात भाजपचे संजय नामदेव बोंबडी आणि शिवसेना (उबाठा)चे सुनिल दत्ताराम तेली यांच्यात थेट लढत होणार आहे. तर कुणकेश्वर (ना.मा.प्र) मतदारसंघात भाजपचे सुनिल बाळकृष्ण पारकर आणि शिवसेना (उबाठा)चे गणेश जगदीश गांवकर यांच्यात सामना रंगणार आहे.
पंचायत समितीच्या निवडणुकीतही अनेक मतदारसंघांत थेट लढती निश्चित झाल्या आहेत. पुरळ (ना.मा.प्र महिला) मतदारसंघात भाजपच्या संजना सत्यवान आळवे आणि शिवसेना (उबाठा)च्या सानवी सुधाकर तिर्लोटकर यांच्यात लढत होणार आहे. तिर्लोट (सर्वसाधारण) मतदारसंघात भाजपचे रविंद्र राजाराम तिर्लोटकर आणि शिवसेना (उबाठा)चे सुनिल गणपत तिलोंटकर आमनेसामने असतील.
मणचे (सर्वसाधारण) मतदारसंघात शिवसेनेचे विलास मधुकर साळसकर आणि शिवसेना (उबाठा)चे विष्णू बाबाजी घाडी यांच्यात लढत होणार आहे. पोंभुर्ले (ना.मा.प्र) मतदारसंघात भाजपचे सादीक जैनुद्दीन डोंगरकर आणि शिवसेना (उबाठा)चे व्यंकटेश जगन्नाथ नर यांच्यात सामना होणार आहे.
तळवडे (अनुसूचित जाती महिला) मतदारसंघात शिवसेनेच्या सलोनी संतोष तळवडेकर आणि काँग्रेसच्या मयुरी मंगेश जाधव यांच्यात लढत निश्चित झाली आहे. किंजवडे (सर्वसाधारण महिला) मतदारसंघात भाजपच्या स्नेहा श्रीकृष्ण अनभवणे आणि मनसेच्या निकीता नारायण दाभोळकर यांच्यात थेट लढत होणार आहे.
मुणगे (सर्वसाधारण) मतदारसंघात भाजपचे सदाशिव पुरुषोत्तम ओगले आणि शिवसेना (उबाठा)चे दीपक नारायण कदम यांच्यात सामना होणार असून, कुणकेश्वर (सर्वसाधारण) मतदारसंघात शिवसेनेचे अमोल विजय लोके आणि शिवसेना (उबाठा)चे गणेश गोपाळ वाळके यांच्यात लढत होणार आहे.
एकूणच देवगड तालुक्यात बिनविरोध निवडींमुळे भाजपची आघाडी स्पष्ट झाली असली तरी ज्या मतदारसंघांत लढती निश्चित झाल्या आहेत तेथे निवडणूक चांगलीच रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
