कार्यकर्त्यांची एकजूट जपण्यासाठी अपक्ष उमेदवार प्रमोद गावडे यांची निवडणुकीतून माघार…

कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडल्याचा केला दावा; भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्यत्वाचा दिला राजीनामा..

⚡सावंतवाडी,ता.२७-: तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रमोद गावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांमधील फूट टाळण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातून अनपेक्षित माघार घेतली आहे. ते अत्यंत भावूक झाले होते. आपण कोणत्याही राजकीय प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी पडलो नसून, केवळ आपले ‘कुटुंब’ मानल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांची एकजूट टिकावी यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणातील प्रामाणिकपणा संपत चालल्याची खंत व्यक्त करत त्यांनी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. यापुढे आपण वैयक्तिकरित्या कोणत्याही पक्षाचे काम करणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
​उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रमोद गावडे यांना कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत होता. मात्र, उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयामुळे मतदारांमध्ये कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी त्यांनी अत्यंत भावनिक स्पष्टीकरण दिले. गावडे म्हणाले की, “हे सगळं होत असताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग झाले. मात्र, मी माझ्या कुलदेवता आई भराडी देवी, तळवडे येथील सिद्धेश्वर देवस्थान, निरवडे येथील भूतनाथ पंचायतन सातेरी आणि सोनुर्ली मळगाव श्री देवी माऊलीची तसेच स्वतःच्या मुलाची शपथ घेऊन सांगतो की, मी कोणत्याही प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी पडलेलो नाही. मतदारांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये.
​उमेदवारी मागे घेण्यामागचे मुख्य कारण सांगताना ते म्हणाले की, माझेच काही निष्ठावान कार्यकर्ते आता विरोधी उमेदवारांकडे जाऊ लागले होते. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे मी नेहमीच एक ‘कुटुंब’ म्हणून पाहिले आहे. या कुटुंबात आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडताना पाहून माझे मन हेलावले आणि म्हणूनच मी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार पर्याय देऊ शकलो नाही, यासाठी त्यांनी जाहीरपणे मतदारांची माफीही मागितली.
​यावेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. आजच्या राजकारणात प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्याला स्थान उरलेले नाही. आम्ही सामान्य लोकांची कामे करतो, पण आता तिथे सहकार्य मिळणे कठीण झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पक्ष राजीनामा दिला असला तरी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाची मुभा दिली आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम जरूर करावे, मात्र मी आता वैयक्तिकरित्या थांबत असून कोणत्याही पक्षाचे काम करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
​खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन पदाबाबत भाष्य करताना त्यांनी सांगितले की, त्यांना हे पद सोडण्याची इच्छा नाही, पण पक्षाने मागणी केल्यास ते तात्काळ राजीनामा देण्यास तयार आहेत. “मला कोणत्याही पदाचा हव्यास नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रवासात निरवडे गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आणि रिंगणात असलेल्या उर्वरित सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमोद गावडे यांच्या या निर्णयामुळे तळवडे परिसरात सध्या चर्चेला उधाण आले आहे.

You cannot copy content of this page