धाकोरे ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम…

ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारली शाळेसाठी संरक्षक भिंत..

⚡सावंतवाडी ता.२७-: जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे नंबर १ ही भौगोलिक दृष्ट्या तशी दुर्गम भागातील शाळा पण ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी निश्चय केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे धाकोरे ग्रामस्थ व शिक्षकांनी.धाकोरे ग्रामस्थांनी शाळेसाठी जवळ जवळ ५० मी. लांबीची संरक्षक भिंत उभारून एक समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला.

  जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे नं. १ चा माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ पालक, व्यवस्थापन समिती या सर्वांनी एकत्र येऊन सुमारे ५० मीटर लांबीची संरक्षक भिंत विना मोबदला शाळेसाठी उभारून दिली व धाकोरे शाळेच्या मुलांच्या संरक्षणाचा प्रश्न सोडवीत  इतरांसाठी आदर्श घालून दिला.

शाळेचा माजी विद्यार्थी संघ ग्रुप कार्यरत असून या ग्रुप वर दीपक मुळीक यांनी शाळेला आर्थिक ,वस्तुरूप मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरूनच शाळेच्या प्राथमिक गरजा भौतिक सुविधा याबाबत चर्चा घडू लागली आणि दात्यांनी आर्थिक तसेच वस्तुरूप देणगी देण्यास सुरुवात केली तर काहींनी दगड (चिरे) सिमेंट वाळू मोफत दिले . काहींनी श्रमदान करून प्रजासत्ताक दिनापूर्वीच सुमारे ५० मीटर लांब संरक्षक भिंत बांधून मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमचा सोडवला. या कामासाठी धाकोरे गावच्या सरपंच स्नेहा मुळीक ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार, उपाध्यक्ष रविंद्र मुळीक, सर्व पालक वर्ग तसेच शाळेच्या आवारात दगड आणून देणारे सर्व माजी विद्यार्थी,ग्रामस्थ गावचे पोलीस पाटील श्रीराम प्रभू राळकर, महादेव (भट) मुळीक , शामसुंदर गोवेकर , नितीन मुळीक, निलेश मुळीक यांनी विशेष परिश्रम घेऊन सदर संरक्षक भिंतीची उभारणी करण्यास मदत केली.यावेळी शाळेतील सर्व माता-भगिनींनी शालेय परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आजगावकर मॅडम शाळेचे उपक्रमशील शिक्षक दिगंबर तळणकर, प्रेरणा गोवेकर, सोनल जाधव यांनीही या कामात सहभाग दर्शविला.

You cannot copy content of this page