रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन…

रस्त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे तहसिलदार यांना निर्देश..

कुडाळ : रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन यशस्वी ठरले आहे. जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात कुडाळ तहसीलदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती दी बुद्धीस्ट फेडरेशनचे पदाधिकारी अंकुश कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अंकुश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘वस्ती तिथे रस्ता’ असे शासनाचे धोरण असतानाही पिढ्यान पिढया रस्त्यापासून वंचित असलेल्या कुपवडे ता. कुडाळ येथील बौद्ध बांधवांनी अनेक वर्षे अर्ज – विनंत्या करुनही सरकार प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने काल २६ जानेवारी- प्रजासत्ताकदिनी कुडाळ तहसिल ते जिल्हाधिकारी कार्यालय लॉंगमार्चचे आंदोलन केले होते.
आठवडाभरापूर्वी जिल्हाधिकारी आणि कुडाळ तहसिलदार यांना आंदोलनाची नोटीस देवूनही दखल घेतली नाही. त्यामुळे काल कुडाळ तहासिल येथे सकाळी ९ वाजता कुपवडे वस्तीतील बौद्ध बांधव तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी तिरंग्याला सलामी देवून लाँगमार्चला सुरुवात केली.
कुडाळ बाजारपेठेतून पायी लाँगमार्च काढताना राजमाता जिजाऊ व संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कुपवडे बौद्ध बांधवांचा पायी लाँगमार्च ओरोसच्या दिशेने निघाला. या लाँगमार्चमध्ये स्त्री- पुरुष मोठ्या संख्येने होते.
लाँगमार्च मुंबई- गोवा महामार्गावर येताच जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांनी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. लाँगमार्च पावशीला पोहचेल व तिथे पावशी बौद्ध वस्तीत विश्रांतीसाठी थांबेल अशा देवून शिष्टमंडळ चर्चेला गेले.
श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपत देसाई, कुपवडे बौद्ध वस्तीचे पदाधिकारी सत्यवान कदम, चांगदेव तांबे,सुनिल तांबे, बाळकृष्ण तांबे, सत्यशोधकचे नेते महेश पेडणेकर, दी बुद्धीस्ट फेडरेशनचे पदाधिकारी अंकुश कदम, अभय पावसकर,पर्णवी जाधव,मधुकर तळवणेकर आदी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्याशी रस्त्याच्या मागणीबाबत चर्चा केली.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १४३ प्रमाणे रस्ता देण्याचे सर्वस्वी अधिकार तहसीलदार यांना आहेत. जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना आदेश दिला तर रस्ता मिळू शकतो रस्त्यासाठी जमीन संपादन करण्याचे पूर्ण अधिकार तहसीलदार यांना कायद्याने दिलेले आहेत फक्त तहसीलदारांनी त्या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
कुपवडे बौद्ध वस्तीच्या रस्त्याच्या मागणीबाबत तहसिलदार यांनी गांभीर्याने कार्यवाही न केल्याने लोकांना लॉंगमार्च काढावा लागल्याने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शिष्टमंडळाच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आचारसंहिता संपताच ग्रामपंचायत, पंचायत समितीचे अधिकारी, कुपवडे बौद्ध ग्रामस्थ व देवस्थान कमिटीचे प्रतिनिधी यांची तातडीने बैठक घेण्याचे व अहवाल देण्याचे लेखी निर्देश तहसिलदार कुडाळ यांना देत असल्याचे सांगितले. तसेच तसे पत्र आजच देत असल्याचे सांगितले आणि लॉंगमार्च स्थगित करण्याचे आवाहन केले. आपला हा निर्णय व आवाहनाचा निरोप घेवून लोकांना सांगतो असे सांगून शिष्टमंडळ परतले.
दरम्यान लॉंगमार्च पावशीला पोहचला होता. पावशी बौद्धवाडीत विश्रांतीसाठी थांबला होता. पावशीच्या बौद्ध बांधवांनी नाश्त्याची सोय केली होती.
शिष्टमंडळ परतल्यावर पावशी समाजमंदिरात सभा घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी लाँगमार्चची दखल घेत तातडीच्या कार्यवाहीची भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पण जोपर्यंत जिल्हाधिकारी यांचे पत्र येत नाही तोपर्यंत लाँगमार्च सुरुच राहील अशी भूमिका घेतली. दरम्यान दुपारी सव्वा एकला जिल्हाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार कुडाळ यांना दिलेल्या लेखी निर्देशाचे पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर लाँगमार्च स्थगित करण्यात आला.
कुपवडे बौद्ध बांधवांच्या रस्त्याच्या मागणीसाठी काढलेल्या लाँगमार्चची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेत तातडीने काढलेल्या लेखी आदेशाने कुडाळ तालुका प्रशासन अँक्शन मोडवर आले.
तहसिलदार कुडाळ यांनी सायंकाळी ६.३० वाजता संबंधित अधिकारी व कुपवडे बौद्ध वस्तीच्या प्रतिनिधींची आपल्या दालनात बैठक घेवून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने कृती कार्यक्रम ठरवला. आणि त्याबाबतचे निर्देश संबंधित अधिकारी यांना दिले. निवडणूक कार्यक्रम संपताच ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान तहसिलदार यांनी कुपवडे वस्तीला भेट देणार असल्याचे सांगितले. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page