विशाल परब:पै. ॲड. अलसुहेब डिंगणकर स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत विजयी संघ व नगरसेवकांचा सत्कार..
⚡सावंतवाडी, ता.२६-: सावंतवाडी नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह विविध पक्षांतून निवडून आलेल्या सर्व वकील नगरसेवकांचा आम्हाला अभिमान आहे, असे गौरवोद्गार भाजपा महाराष्ट्र युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी काढले.
युनायटेड सिंधुदुर्ग क्रिकेट टीमतर्फे सावंतवाडी जिमखाना मैदानावर आयोजित पै. ॲड. अलसुहेब डिंगणकर स्मृतीचषक वकील क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. नीता सावंत-कविटकर आणि ॲड. सायली दुभाषी या नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सातारा क्रिकेट संघ आणि सांगली क्रिकेट संघ आमनेसामने आले. चुरशीच्या लढतीत सातारा संघाने सांगली संघावर मात करत विजेतेपद पटकावले. या रंगतदार सामन्याचा आनंद क्रिकेटप्रेमींनी मनमुराद लुटला.
यावेळी बोलताना विशाल परब यांनी पै. ॲड. अलसुहेब डिंगणकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. २०११ पासून आपण या स्पर्धेला सातत्याने सहकार्य करत असल्याचे तसेच सावंतवाडी बार असोसिएशनसोबत पुणे व मुंबई येथेही स्पर्धांसाठी उपस्थित राहत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सावंतवाडी नगरपरिषदेवर अभ्यासू वकिलांमधून चार नगरसेवक निवडून आल्याचा विशेष आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सावंतवाडी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा वकील संघटना अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. डी. के. गावकर, ॲड. नीता सावंत-कविटकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. सायली दुभाषी, मुख्य आयोजक ॲड. अनिल केसरकर, अण्णा बांदेकर तसेच युनायटेड सिंधुदुर्ग क्रिकेट टीमचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
