वेंगुर्ला मच्छिमार्केटचे विस्तारीकरण वर्षभरात…

नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांची माहिती

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला सागररत्न मच्छिमार्केट अद्ययावत असे साकारले असले तरी मच्छिमार विक्रेत्यांची संख्या पाहता जागा अपुरी पडत असल्याने काही समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे आपल्या येथील मच्छीविक्रेत्या महिलांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून येत्या वर्षभरात मच्छिमार्केटचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे, असे आश्वासन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी आज सोमवारी (दि. 19 जानेवारी )मच्छिमार शिष्टमंडळाला दिले. रविवारी दुपारी कर्मचाऱ्याकडून मच्छीविक्रेत्या महिलांचे मासे कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे
मच्छिमार बांधवानी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानुसार आज सोमवारी सकाळी मच्छिमार नेते वसंत तांडेल यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमार नेते दादा केळूसकर, महादेव मोटे, सुहास तोरसकर, किशोर रेवणकर, आनंद वेंगुर्लेकर, गंगाराम गिरप, आनंद देवजी, भाग्यवान गिरप, राजन कुर्ले, संतोष तांडेल, पूनम गिरप, तपस्विनी तांडेल, शांती तोरसकर, राजेश गिरप आदिसह अन्य मच्छिमार बांधव शिष्टमंडळाने नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची भेट घेऊन चर्चा केली व विविध समस्या मांडल्या. यावेळी रविवारी झालेल्या प्रकाराबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना समज देऊन पुनःश्च असे प्रकार केल्यास प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले व नुकसानग्रस्त विक्रेत्यांना नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी भरपाई देण्यात आली. सध्या मच्छीमार्केट विस्तृत असले तरी इतरांना बसण्यास जागा अपुरी पडत आहे, याकडे वसंत तांडेल यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत येत्या 2 दिवसात नजिकच्या ठिकाणी मार्केटच्या बाजूला मच्छिमार प्रतिनिधी सोबत जागा पाहणी करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिले. वाहतुकीस अडथळा होत असल्याने मच्छी विक्रेत्यांनी पिराचा दर्गा कॉर्नर येथे बसू नये. तसेच रविवारी आठवडा बाजार दिवशी भाजी व मच्छी विक्रेत्यांना अन्य योग्य ठिकाणी वाहतुकीस अडथळा न करता विक्रीसाठी सवलत देण्यात यावी, असे निश्चित करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक गौरी मराठे, सचिन शेट्ये आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page