प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज विक्रीवर कठोर कारवाईची मागणी…

हिंदू जनजागृती समितीचे पोलीस प्रशासनाला निवेदन..

⚡सिंधुदुर्गनगरी ता १९-: प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकपासून बनविलेले राष्ट्रध्वज विक्रीस ठेवून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत हिंदू जनजागृती समितीने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. प्लास्टिक बंदी असतानाही दुकाने तसेच ऑनलाइन माध्यमांतून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, टी-शर्ट व इतर वस्तूंची विक्री सुरू असल्याने राष्ट्रध्वजाचा सन्मान धोक्यात आला असल्याचा आरोप समितीने केला आहे.
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता असून २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी मोठ्या अभिमानाने फडकविले जाणारे ध्वज अनेकदा रस्त्यावर, कचरापेटीत अथवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज लवकर नष्ट न होत असल्याने अनेक दिवस त्यांची विटंबना होत राहते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या विषयावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजामुळे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आहेत. केंद्र व राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असतानाही प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्री करणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय मानचिन्हांचा अवमान रोखणे कायदा १९७१, तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांनुसार अशा प्रकारची विक्री दंडनीय अपराध ठरतो. तरीही अनेक ठिकाणी सर्रास प्लास्टिकचे ध्वज, टी-शर्ट व इतर साहित्य विकले जात असल्याने कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे.
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदू जनजागृती समिती गेल्या २३ वर्षांपासून जनजागृती करत आहे. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांनी राष्ट्रध्वजासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव ठेवून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा मान राखावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, टी-शर्ट व अन्य साहित्य विकणाऱ्या व्यक्ती, दुकाने, संस्था किंवा संघटनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. यावेळी सुभाष चव्हाण, रविंद्र परब, सुरेश दाभोलकर, जयदीप सावंत, विलास मसुरकर, परेश साटम आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page