⚡सावंतवाडी ता.१९-: तालुक्यातील मळगाव येथील सुमन झिलू खडपकर यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या एकदंती श्री वन विनायकाच्या स्थळी दरवर्षीप्रमाणे गुरुवार २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सुमन खडपकर यांना सन २००० साली जंगलात एकदंती लाकडी गणेशमूर्ती आढळून आली होती. सदर गणेशमूर्ती त्यांनी आपल्या घरी आणून तिला स्थापित करून विधिवत पूजन सुरू केले. गेल्यावर्षी त्यांनी या एकदंती गणेशमूर्तीचे “श्री वन विनायक” असे नामकरण सुद्धा केले. या लाकडी एकदंती गणपतीच्या पूजनाला यंदा २६ वे वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त सकाळी श्री गणेश पूजन व अभिषेक सोहळा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता कीर्तनकार सुमन खडपकर यांचे कीर्तन होणार असून, या कीर्तनास हार्मोनियम वादक मयूर गवळी यांची संगीतसाथ लाभणार आहे. रात्री ९ वाजता भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मळगाव परिसरातील भाविक भक्तांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त खडपकर परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
मळगाव येथील सुमन खडपकर यांच्या निवासस्थानी २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सव…
