⚡बांदा ता.१७-: मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त येथील नट वाचनालयात १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत समाजप्रबोधनपर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा बुधवार, दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता नट वाचनालय, बांदा येथे संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धा ही अंकुश माजगावकर व परिवार यांनी (कै.) परशुराम नाईक व (कै.) लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कृत केली आहे.
ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी या दोन गटात होणार आहे. पहिल्या गटासाठी ‘माझी सहल’ व ‘शिक्षण व संस्कार’ हे विषय असून या गटासाठी शब्दमर्यादा ५०० शब्द असून वेळ १ तास देण्यात येणार आहे. दुसऱ्या गटासाठी ‘मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी समाजाचे योगदान’ व ‘स्वामी विवेकानंद – युवकांचे प्रेरणास्थान’ हे विषय ठेवण्यात आले असून या गटासाठी शब्दमर्यादा ८०० शब्द असून वेळ १ तास देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यापुरती मर्यादित असून, प्रत्येक शाळेतून प्रत्येकी गटासाठी चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी व शाळांनी आपली नावे शनिवार, दिनांक २४ जानेवारी पर्यंत नट वाचनालय, बांदा येथे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त नट वाचनालयात निबंध लेखन स्पर्धेच आयोजन
