जि.प., पं.स. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी महायुतीचा प्रस्ताव राणेंकडे सादर करणार…

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती:जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ठराव; तालुकानिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्ती…

⚡कणकवली ता.१७-:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे युतीसंदर्भातील प्रस्ताव रविवारी सादर करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत जि.प. निवडणुकीसाठी तालुकानिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्तीही करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बैठक येथील मातोश्री मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, उद्योग-व्यापार सेल जिल्हाध्यक्ष आशिष कदम, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अस्लम खतीब, युवक जिल्हाध्यक्ष निशीकांत कडुलकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले की, येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या भागात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तयारीला सुरुवात करावी. निवडणूक प्रभारींनी आपल्या-आपल्या तालुक्यात जाऊन ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तेथे बैठका घेऊन नियोजन करावे. रविवारी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांच्याशी युतीबाबत चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांची निश्चिती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेश चिटणीस एम. के. गावडे यांनी तालुकाध्यक्षांना आपापल्या तालुक्याचा सविस्तर अहवाल जिल्हाध्यक्षांकडे सादर करण्याच्या सूचना केल्या. ज्या भागात पक्षाची ताकद अधिक आहे, त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी, या अनुषंगाने प्रस्ताव द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर यांनी पक्ष संघटना मजबूत करताना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन केले.

तसेच पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी तालुकानिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यानुसार सावंतवाडी व दोडामार्गसाठी उमाकांत वारंग व संदीप राणे, कणकवली, देवगड, वैभववाडी व मालवणसाठी सावळाराम अणावकर, तर कुडाळ व वेंगुर्लेसाठी एम. के. गावडे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

You cannot copy content of this page