वायरी तारकर्ली रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी छेडले आमरण उपोषण

मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर आंदोलन

*💫मालवण दि.०१-:* वायरी तारकर्ली या पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाल्याने रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत वेळोवेळी लक्ष वेधुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी मंगळवारी मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन छेडले. दरम्यान या रस्त्याच्या मंजूर असलेल्या डांबरीकरणाच्या कामास कोरोना महामारीमुळे शासनाकडून कार्यारंभ आदेश न मिळालेला नाही, १० डिसेंबर पर्यंत कार्यारंभ आदेश मिळाल्यावर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, अन्यथा खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात येईल, असे आश्वासन अभियंता श्री. दाणे यांनी दिल्याने बापर्डेकर यांनी उपोषण स्थगित केले. मालवण मेढा-राजकोट येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालया समोर सुरेश बापार्डेकर हे सकाळी ११ वाजल्यापासून उपोषणास बसले. त्यांच्या समवेत या उपोषणात प्रकाश बापर्डेकर, प्रसाद बापर्डेकर, प्रतीक कुबल, साईराज चव्हाण, सिद्धेश मयेकर, वैभव सावंत, आपा कोळंबकर हे सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील तारकर्ली हा गाव पर्यटन दृष्ट्या महत्वाचा समजला जातो. मालवणातून तारकर्ली कडे जाणारा वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून पावसात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पावसाळी कालावधीत या रस्त्याची डागडुजी करूनही काही उपयोग झालेला नाही. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण होणे गरजेचे आहे. मात्र याबाबत वारंवार मागणी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले, असे यावेळी सुरेश बापर्डेकर यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व बाबा परब यांनी उपोषण स्थळी भेट देऊन बापार्डेकर यांच्या उपोषणाला पाठींबा दिला. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता श्री. नितीन दाणे यांनी तारकर्ली रस्त्याच्या कामाबाबतचे माहिती पत्र बापार्डेकर यांना सादर केले. वायरी तारकर्ली रस्त्याच्या डांबरीकरण, रुंदीकरण पेव्हड शोल्डर व भूमिगत गटारासह रुंदीकरणाचे रुपये ९३ कोटी २४ लाख किमतीचे काम मंजूर असून या कामाची निविदा प्रक्रिया शासन स्थरावर सुरू आहे. मात्र या निविदेस प्रतिसाद मिळत नसल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सद्यस्थितीत राज्य दर सूचित सुधारणा झाल्याने नव्याने या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हे काम सुरू होण्यास विलंब होत असल्याने रस्त्यावर विशेष दुरुस्ती अंतर्गत रुपये १६ लाख किमतीचे डांबरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले होते. परंतु कोरोना महामारीमुळे या कामास शासनाकडून अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. तरी रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता विशेष बाब म्हणून तारकर्ली-देवबाग रस्त्याच्या कामास कार्यारंभ आदेश मिळण्यासाठी फेरप्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दि १० डिसेंबर पर्यंत विशेष दुरुस्तीचे काम सुरू करण्यास मंजुरी न मिळाल्यास या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात येईल तरी उपोषण स्थगित करावे असे अभियंता श्री. दाणे यांनी माहिती पत्रकाद्वारे सांगितले. अभियंता दाणे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे सुरेश बापार्डेकर यांनी आपले उपोषण स्थगित केले. मात्र १० डिसेंबर पर्यंत डांबरीकरण कामास परवानगी न मिळाल्यास तसेच १० डिसेंबर नंतर खड्डे भरण्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र जण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी सुरेश बापार्डेकर व भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी बांधकाम अभियंत्यांना दिला.

You cannot copy content of this page