मालवण तालुका काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते निर्धार.
⚡मालवण ता.१५-:
मित्र पक्ष सोबत असून वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडी असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला योग्य तो मानसन्मान मिळावा तसेच जागा वाटपात काँग्रेसच्या उमेदवारांना हव्या असलेल्या जागांमध्ये प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करतानाच यासाठी मित्र पक्षाने तयारी न दर्शविल्यास स्वबळावर लढूया, असा निर्धार मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार यांनी सर्वानुमते केला, अशी माहिती काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीबाबत चर्चा व इच्छुक उमेदवारांशी विचार विनिमय करण्यासाठी मालवण तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस तथा तालुका निवडणूक प्रभारी अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, श्रीकृष्ण तळवडेकर, आप्पा चव्हाण, देवांनंद लुडबे, मधुकर लुडबे, गणेश पाडगावकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, चिंदर उपसरपंच महेंद्र मांजरेकर, मेघश्याम लुडबे, विरेश देऊलकर, पराग माणगावकर, दिलीप तळगावकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
या बैठकीत मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद मतदार संघ आणि बारा पंचायत समिती मतदार संघ यावर चर्चा झाली. त्या त्या मतदार संघात असलेल्या काँग्रेस पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना प्रवाहात आणणे आणि त्याठिकाणी त्यांच्यासोबत खळा बैठका घ्याव्यात असे ठरविण्यात आले. तसेच निवडणुकीसाठी आवश्यक रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस काही इच्छुक उमेदवार व त्यांच्यासोबत त्या त्या प्रभागातील काही ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित असलेल्या चार जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार आणि सहा पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवारांकडून त्यांच्या कार्याचा अहवाल प्रामुख्याने घेण्यात आला. यावर उपस्थित
माजी जिल्हापरिषद, पंचायत समिती सदस्य, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या सोबत या मतदार संघांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस महेंद्र मांजरेकर यांनी केले.
