⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर मडकीलवाडी येथे मुलाने घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने अंगणात बसलेल्या आपल्या आईवर बंदुकीने गोळी झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या भयंकर घटनेने अणसूर गावासाह वेंगुर्ला तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.उमेश सरमळकर (वय 40 रा. अणसूर) असे संशयिताचे नाव असून दाखल फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केल्यावर वेंगुर्ला पोलिसांनी त्यास अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
वासंती सरमळकर (वय 65, रा. अणसुरपाल, मडकीलवाडी तालुका वेंगुर्ला) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही दुर्घटना बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी रोजी 8.30 वा. च्या सुमारास घडली. या दुर्घटनेबाबत जागृती सरमळकर (वय 33, मूळ रा. अणसुर मडकीलवाडी सध्या रा. विनायक रेसिडेन्सी कॅम्प वेंगुर्ला, तालुका वेंगुर्ला ) यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
उमेश सरमळकर यांनी वेगवेगळ्या बँकाचे कर्ज काढलेले होते. त्या कारणावरुन सासू वासंती व दिर उमेश यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत असत, असे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे.त्यानुसार संशयितावार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड,,पोलीस हवालदार प्रथमेश पालकर, योगेश राऊळ, योगेश सराफदार, मंगेश जाधव, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर, स्वप्नील तांबे, प्रकाश कदम, गौरी ताम्हणेकर आदीनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, डीवायएसपी विनोद कांबळे यांनी घटनास्थळी व्हिजिट देत घटनेची माहिती घेतली. मयत महिलेचा मृतदेह वेंगुर्ला, ओरोस येथून तदनंतर कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटल येथे हलविण्यात आला आहे.
सदर गुन्हा 15 जानेवारी रोजी मध्यरात्री वेंगुर्ला पोलीस स्थानकात दाखल झाला असून सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली बंदूक जप्त करण्यात आली आहे. या घटनेचा पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी हे अधिक तपास करीत आहेत.दरम्यान आज गुरुवारी उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी सायंकाळी उशिरा वेंगुर्ला पोलीस स्थानकास भेट देऊन माहिती घेतली.
