बांदा/प्रतिनिधी
राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संघटना व युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत कार्यरत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या खेळो इंडिया योजनेअंतर्गत अर्नाळा बीच विरार येथे संपन्न झालेल्या स्टेअर्स युथ महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत थर्ड डिग्री ब्लॅकबेल्ट कराटे प्रशिक्षक किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७ विद्यार्थ्यांनी तब्बल ४५ पदके पटकाविली. या स्पर्धेत राज्यभरातून ४५०० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
पदके जिंकलेल्या विद्यार्थ्यांची निवड आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत कुमिते (फाईट) प्रकारात २२ पदके मिळविली आहेत. काता प्रकारात २३ पदके प्राप्त केली आहेत. एकूण ४५ पदके मिळवीत विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत शिरोडा येथील अ वि बावडेकर हायस्कुल आणि गोगटे कॉलेज, बांदा येथील खेमराज हायस्कुल व तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज, बांदा दिव्य ज्योती हायस्कुल, मळगाव न्यू इंग्लिश स्कुलच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश मिळविले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना थर्ड डिग्री ब्लॅकबेल्ट कराटे प्रशिक्षक किरण देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या विविध शालेय क्रीडा स्पर्धामध्ये कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग प्रकारात किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदके मिळविली आहेत.
किरण देसाई म्हणाले की, “खेळो इंडिया योजनेअंतर्गत झालेल्या या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. २७ विद्यार्थ्यांनी ४५ पदके पटकावणे ही केवळ वैयक्तिक मेहनतीची नाही, तर सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाची पावती आहे. कुमिते आणि काता या दोन्ही प्रकारात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचा पाठिंबा तसेच संबंधित शाळा-महाविद्यालयांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यापुढेही अधिक मेहनत घेऊन देशपातळीवरही सिंधुदुर्गचा लौकिक वाढवावा. भविष्यात कराटेसह इतर मार्शल आर्ट्स प्रकारांतून अधिकाधिक खेळाडू घडविण्याचा आमचा संकल्प असून, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.
अर्नाळा बीचवरील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सिंधुदुर्गचा डंका…
