संदेश पारकर यांची पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी
*💫कणकवली दि.१६-:* सर्व प्रकारच्या व्यापारासाठीची वेळ वाढवून मिळावी तसेच तौक्ते वादळामुळे जिल्ह्यातील जनतेची जी काही हानी झाली आहे त्याची त्वरीत नुकसान भरपाई मिळावी. जिल्हासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन अधिक प्रमाणात उपलब्ध करुन मिळाव्यात अशा विविध मागण्या शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे केल्या. वरील सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करुन हे सर्व प्रश्न त्वरीत मार्गी लावले जातील अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी संदेश पारकर यांना दिली. लॉकडाऊनमधे थोडी शिथिलता देण्यात आली असली तरी व्यापार व उद्योगासाठी देण्यात आलेली वेळ हि तुटपुंजी असुन वेळ कमी असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना संक्रमण धोका अधिक वाढत आहे. तसेच तौक्ते वादळामुळे जिल्ह्यात घरांची, मच्छिमारांची तसेच शेतीबागायतींची खुप मोठी हानी झाल्याने प्रशासनाला त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यासाठी जिल्ह्यासाठी अधिक प्रमाणात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यासाठी मंजुर झालेले ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर सुरु करणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबींचा प्राधान्याने विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशा मागण्या पारकर यांनी केल्या. या सर्व मागण्यांचा विचार केला जाईल, अशी ग्वाही।पालकमंत्री सामंत व खासदार राऊत यांनी पारकर यांना दिली.
