देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलच्या २५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप…

⚡मालवण, ता.१४-:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग येथील इयत्ता आठवी ते दहावीमधील २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकली आणि हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
या सायकलींचे वाटप कंपनीचे मुंबई ब्रांच आयटी हेड दीपेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे गोवा ब्रांच सेल्स मॅनेजर सुरज साळगावकर, ऑपरेशन इन्चार्ज स्नेहल मातोंडकर आणि पत्रकार अमोल गोसावी उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना रुपेश खोबरेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास येरागी, संस्था सदस्य निलेश सामंत आणि श्रीमती तारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दीपेश गोसावी यांनी सांगितले की, “शिक्षण क्षेत्रात मदत करताना आम्हाला आनंद होत आहे. भविष्यात जर शाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पटसंख्या वाढली, तर कंपनीच्या वतीने अजूनही मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारची मदत करण्यास आम्हाला नक्कीच आवडेल.”
कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक विवेक गोसावी यांनी केले, आभार रुपेश खोबरेकर यांनी मानले. ग्रामीण भागातील मुलांसाठी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल पालकांनी आणि ग्रामस्थांनी कॅनरा रोबेको कंपनीचे विशेष आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page