मालवणात २२ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा…

इकोफोक्स व्हेंचर्स, कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभाग यांच्यातर्फे आयोजन..

⚡मालवण ता.१४-:
पर्यावरण तसेच कांदळवनाविषयी मुलांमध्ये प्रचार प्रसार होऊन जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने इको फोक्स व्हेंचर्स, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे, या स्पर्धेसाठी मालवण मधील अभियान आम्ही मालवणी, हॉटेल चैतन्य व उबंटू कॅफे, पिंटो सी फूड आणि एशियन इन्फोटेक हे सहप्रायोजक आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मालवण येथील चैतन्य हॉटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या स्पर्धेची माहिती देण्यात आली. यावेळी अभियान आम्ही मालवणीचे अध्यक्ष रुजारिओ पिंटो, चैतन्य हॉटेलचे नितीन वाळके, अजय मुणगेकर आदी उपस्थित होते.

यावेळी नितीन वाळके यांनी या स्पर्धेची माहिती दिली. जागतिक पाणथळ जागा दिवसानिमित्त गेली काही वर्षे या स्पर्धेचे आयोजन करून मुलांमध्ये पर्यावरण तसेच पर्यावरणा तील पाणथळ जागा आणि त्यामध्ये असणाऱ्या कांदळवनाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी खाजण (वेटलैंड) जैवविविधतेचे साजण, नेमेचि येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा आणि सागरा (चा) प्राण तळमळला ? असे तीन विषय ठेवण्यात आले आहेत.

स्पर्धेसाठी प्रथम – रु. १२,०००/- चषक व प्रमाणपत्र, द्वितीय :- रु. ८,०००/- चषक व प्रमाणपत्र, तृतीय :- रु. ५,०००/- चषक व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ:- रु. २,०००/- चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट लेखन व दिग्दर्शन याकरीता प्रत्येकी रु. ५००/- चषक व प्रमाणपत्र, पुरुष अभिनय, स्त्री अभिनय याकरीता प्रथम तीन क्रमांकांना आणि तांत्रिक अंग म्हणून प्रथम तीन क्रमांकांना चषक, प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

दि. २२ फेब्रुवारी सकाळी १० वा. ही स्पर्धा सुरु होऊन सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ होईल. स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या दहा संघास प्राधान्य देण्यात येईल. संघात किमान सहा व कमाल दहा विद्यार्थी असावेत. मालवण तालुक्या बाहेरून येणाऱ्या संघास रु. १,२००/- प्रवास खर्च दिला जाईल. इच्छुक संघानी आपली नावे प्रवेश फी रु. २००/- व अनामत रक्कम रु. १०००/- सहीत दि. ३१ जानेवारी पर्यंत द्यावीत. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी नितीन वाळके – ९४२२०५४५८८ व रवींद्र तळाशीलकर – ९४२२५८४८६२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

You cannot copy content of this page