⚡सावंतवाडी,ता.१०-: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये ग्रामपंचायतीमध्ये उद्या, दिनांक ११ रोजी सकाळी १० वाजता विशेष ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी तरुणाईचा प्रेरणास्रोत असलेले सुप्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप तसेच कोकणची अष्टपैलू अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहेत.
हा सोहळा सकाळी १०.३० वाजता ढोल-ताशांच्या गजरात आणि मान्यवरांच्या स्वागताने सुरू होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेवडकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध अभियानाची उद्दिष्टे तसेच वेत्ये ग्रामपंचायतीच्या प्रगतीची यशोगाथा सादर करण्यात येणार आहे.
वेत्ये ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्यास सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच, उपसरपंच तसेच वेत्ये ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
