⚡मालवण ता.०८-:
मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी व आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी संशोधन करून निर्मिती केलेल्या लाल शेवग्याच्या वाणाला केंद्र सरकारकडून पेटंट मिळाले असून यामुळे श्री. फोंडेकर यांनी कृषी क्षेत्रात मोठे यश प्राप्त केले आहे.
कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर हे गेली काही वर्षे आंबा उत्पादन तसेच शेवग्याच्या शेतीमध्ये संशोधन करत आहेत. आंबा उत्पादनात त्यांनी अनेकवेळा बाजारात हापूस आंब्याची पहिली पेटी विक्रीसाठी आणण्याचा मान मिळवीत जागतिक विक्रमही केला आहे. शेवग्याच्या पिकात लाल शेवगा निर्माण करण्यासाठी त्यांची गेली काही वर्षे संशोधन व कार्य सुरु होते. त्यांनी मोनो हायब्रीड व डाय हायब्रीड पद्धतीने लाल शेवगा विकसित करून त्याचचे पेटंट मिळवण्यासाठी नवी दिल्ली येथे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर याबाबत शहानिशा करण्यासाठी दिल्ली केंद्राचे पथक दोन वेळा फोंडेकर यांच्याकडे येऊन लाल शेवग्याच्या झाडाची तपासणी केली. त्यानंतर दिल्ली केंद्राने लाल शेवग्याचे पेटंट मान्य करत ते दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाकडे पाठवले होते. कृषी विद्यापीठाकडून आता जानेवारी महिन्यात फोंडेकर यांना लाल शेवग्याचे पेटंट म्हणजेच स्वामीत्व प्रदान करण्यात आले.
याबाबत उत्तम फोंडेकर म्हणाले, लाल शेवग्याच्या वाणाचे अशा प्रकारचे पेटंट मिळण्याची जागतिक स्तरावरील पहिलीच गोष्ट आहे. या शेवग्यामध्ये इतर शेवग्याच्या जाती पेक्षा प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम यांची मात्र जास्त प्रमाणात आहे. या शेवग्याची लांबी दीड ते दोन फूट एवढी आहे, असेही ते म्हणाले.
