समजपूर्वक वाचन स्पर्धेत सौ. मधुचंदा वस्त यांची चमकदार कामगिरी…

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड: शिक्षक पालक ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे अभिनंदन..

⚡मालवण ता.०८-: राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित समजपूर्वक वाचन – कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्यातील शाळा कोळंब नं. १ येथील शिक्षिका सौ. मधुचंदा निखिल वस्त यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला आहे. या यशाच्या जोरावर त्यांची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील शिक्षकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तालुका, विभाग आणि राज्य अशा तीन स्तरांवर ही स्पर्धा पार पडली.

सौ. मधुचंदा वस्त यांनी मालवण तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या या विभागीय स्पर्धेत कोल्हापूर विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातून प्रथम आलेल्या शिक्षकांचा सहभाग होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत त्यांनी पाचवा क्रमांक मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.

या यशाबद्दल मालवण तालुका गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, कोळंब सरपंच सौ. सिया धुरी, सौ. आरती कांबळी, सौ. नार्वेकर, तसेच शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page