⚡दोडामार्ग ता.०५-:
आजच्या डिजिटल आणि वेगवान जीवनशैलीत विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अभ्यासापासून दूर जात असून सोशल मीडिया, मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सकडे अधिक आकर्षित होत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, आचार-विचारांवर तसेच भविष्यातील प्रगतीवर होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वाचनसंस्कृती रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी केले.
ते दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक वाचन उपक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा पत्रकार तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समीर ठाकूर, पत्रकार संदेश देसाई, ग्रंथपाल डॉ. रामकिसन मोरे, प्रा. डॉ. सोपान जाधव, प्रा. डॉ. पी. डी. गाथाडे, प्रा. डॉ. संजय खडपकर, प्रा. डॉ. प्रशांत ढेपे, प्रा. डॉ. राजेंद्र इंगळे, प्रा. दिलीप बर्वे, प्रा. रोहन बागकर, प्रा. यश गवस, प्रा. कु. दर्शनी कोटकर, प्रा. शेफाली गवस आदि उपस्थित होते
प्राचार्य डॉ. सावंत पुढे म्हणाले की, आज अनेक विद्यार्थी आपले वाईट होऊ नये अशी अपेक्षा बाळगतात; मात्र ज्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे त्या न करता अनावश्यक गोष्टींकडे अधिक वेळ देतात. जीवनात प्रगती करायची असेल, आचार-विचारात सकारात्मक बदल घडवायचा असेल आणि सुसंस्कृत जीवन जगायचे असेल तर मिळेल ते पुस्तक वाचणे आवश्यक असून रोजच्या जीवनात वाचनाला महत्त्व दिले पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी सामूहिक वाचनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध विषयांवरील पुस्तके, आत्मचरित्रे, सामाजिक व प्रेरणादायी साहित्याचे वाचन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या विचारविश्वात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.
या सामुहिक वाचन उपक्रमाचे उद्घाटन पत्रकार श्री समीर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पत्रकार समीर ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. आजची तरुण पिढी पुस्तकांपासून दूर जाऊन सोशल मीडियावर अधिक वेळ घालवत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अशा वाचन उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आणि स्तुत्य आहे. अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील, असे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या या सामूहिक वाचन उपक्रमामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, नैतिक व सामाजिक विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी सर्व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ग्रंथपाल डॉ. रामकिसन मोरे व कल्पेश गवस यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन आवश्यक – डॉ. सुभाष सावंत…
