विद्यार्थी, पालक, शाळा प्रेमींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा…

हजारोंच्या संख्येने सहभागी आंदोलकांनी जिल्हा राजधानी सोडली दणाणून..

सिंधुदुर्गनगरी ता ५
शाळा वाचवा शिक्षण वाचवा ,आमच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका, आमची शाळा बंद करू नका. अशी मागणी करत आज विद्यार्थी पालक आणि शिक्षण प्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आणला. हजारोच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थी पालकानी १५ मार्च २०२४ च्या अन्यायकारक शासन निर्णया विरोधात आक्रोश करत तो रद्द करण्याची मागणी केली.

शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच ,सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली आज ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढून शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णया विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या मोर्चात शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षण प्रेमी, शालेय संस्थाचालक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सरपंच, हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चात विद्यार्थी पालकांसह माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संजय वेतोरेकर, राजन कोरगावकर, रावजी यादव, अमरसेन सावंत, जगदीश चव्हाण, नागेश ओरोसकर आदी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

शाळा वाचवा शिक्षण वाचवा, अन्यायकारक १५मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करा. अशा गगनभेदी घोषणा देत ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या कडून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

यावेळी विद्यार्थिनी स्नेहा लाड हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण प्रवाहात आणले. शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. त्यामुळे आज अनेक महिला उच्च पदावर काम करीत आहेत. तेच स्वप्न आमचेही आहे, पण शासनाने १५ मार्च २०२४ ला शासन निर्णय काढून आमचा शिक्षणाचा प्रवासच खडतर बनविला आहे. पटसंखेनुसार शिक्षक दिले जात असल्याने अनेक शाळा बंद झाल्या आहेत. आमचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जात आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे अशी आमची मागणी असून या शासन निर्णयामुळे आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहील.

यावेळी विद्यार्थिनी पौर्णिमा घाडी हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे .ग्रामीण भागातील शाळा बंद झाल्या तर शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी दूर जावे लागणार आहे. आमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. विद्यार्थी पट कमी यात आमचा दोष काय? पटसंख्या कमी म्हणून शाळा बंद करणे हा उपाय नसून शाळा ही केवळ इमारत नसून आमचे भविष्य आहे. ते घडविन्यासाठी शासनाने अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा.

मुलांच्या भवितव्यासाठी कायम सोबत

सिंधुदुर्ग जिल्हा परीक्षांच्या निकालात राज्यात कायम अव्वल राहिला आहे. असे असताना एका अन्यायकारी शासन निर्णयाने येथील गोरगरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्कच हिरावून घेतला जात आहे. स्वतःच्या हक्कासाठी आता विद्यार्थ्यांना स्वतःच लढले पाहिजे, प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने अनेक शाळा बंद झाल्या आहेत. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत. १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय म्हणजे जिल्ह्यावर आलेले मोठे संकट आहे. त्याला एकजुटीने सामोरे गेले पाहिजे, आजचा हा मोर्चा खरोखरच लक्षवेधी आहे. मुलांच्या भवितव्यासाठी मी केव्हाही कायम सोबत असेन— वैभव नाईक, माजी आमदार सिंधुदुर्ग,

पुन्हा अशिक्षितांची संख्या वाढणार

शासनाकडून नेहमीच ग्रामीण शाळांकडे दुर्लक्ष केला जात आहे. येथील भौगोलिक स्थिती विचारात घेऊन पटसंख्येनुसार शिक्षक न देता, वर्ग तेवढे शिक्षक देण्याची गरज आहे. तरच येथील शाळा सुरू राहणार आहेत व ग्रामीण विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहणार आहेत. न पेक्षा साक्षर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा अशिक्षितांची संख्या वाढणार आहे–सतिश सावंत, शिक्षण संस्थाचालक,

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेगळ्या निकषाची गरज

पालकमंत्री नितेश राणे यांनी आजच्या विद्यार्थी पालकांच्या मोर्चाला भेट दिली, यावेळी संजय वेतोरेकर यांनी त्यांना शासनाच्या १५ मार्च च्या निर्णयाने येणाऱ्या अडचणी आणि त्याचा जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर होणारा परिणाम याबाबत माहिती दिली .त्यानंतर मोर्चाला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले की, आपण जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने व शासनाचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. ग्रामीण भागातील शाळा टिकल्या पाहिजेत. येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे हे माझेही मत आहे. त्यामुळे १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाबाबत आपण मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. संपूर्ण राज्याचा विचार करून काढलेला शासन निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर व येथील शिक्षण व्यवस्थेवर अन्याय करणार असेल तर तो रद्द अथवा त्यामध्ये सकारात्मक बदल करण्यास भाग पाडले जाईल. येथील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सिंधुदुर्गासाठी वेगळा निकषाची गरज आहे आणि त्यासाठी माझा आग्रह राहील. अशी ग्वाही देतो—नितेश राणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग,

You cannot copy content of this page