*मानधनातील अनिश्चिततेमुळे क्षयरोग आणि कुष्ठरोग सर्वेक्षणास कुडाळ तालुक्यातील आशा वर्कसचा नकार*

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा वर्कर्स व आशा गट प्रवर्तक कोरोना काळात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या आरोग्याची माहिती संकलित करत आहेत. हे काम सुरू असतानाच शासनाने आता क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हेही आशांनी करावा असे आदेश काढले आहेत. मात्र या सर्व्हेच्या मानधनात अनिश्चितता असल्याने हा सर्व्हे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदनही कुडाळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केले आहे.

आरोग्य संबंधित अनेक योजनांची कामे आशा गट प्रवर्तक व आशा वर्कर्स करत आहेत.सद्या कोरोना कालावधीत आशा प्रत्येक घराघरात जावून सर्व्हे करत आहेत. हा सर्व्हे सुरू असतानाच शासनाने आता क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हे करण्याची जबाबदारी आशांच्या पदरी टाकली आहे. तसेच हा सर्व्हे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. गतवर्षी हा सर्व्हे करण्यासाठी आशांना तटपंजे मानधन देण्यात आले होते. त्यावेळी हा सर्व्हे करण्यासाठीच्या मानधनात वाढ करण्याची मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावेळी पुढील सर्व्हेवेळी समाधानकारक मानधन दिले जाईल असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र मानधन वाढीबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवाय तालुका स्तरावर झालेल्या बैठकांमध्ये प्रतिदिन २०० रुपये मानधन दिले जाईन असे सांगण्यात आले होते. तर आता प्रत्यक्षात १०० रुपये दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हे साठी आशांना वाढीव मानधन न देत त्यांना कमी मानधनात हा सर्व्हे करण्यास सांगून शासन आशां च्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचा आरोप कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी केला आहेत. तसेच कुडाळ तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या १३४ आशा कर्मचाऱ्यांनी हा सर्व्हे करण्यास नकार दिला आहे. याबाबतचे निवेदन कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी यांना सादर केले आहे.

You cannot copy content of this page