⚡ओरोस ता २२-: मालवण तालुक्यातील आंबडोस गावच्या देवस्थान पंचायतनातील श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव मंगळावर २३ डिसेंबर रोजी साजरा होत आहे.
यानिमित्त सकाळी ११ वाजता देवीला कौल लावला जाणार आहे. त्यानंतर परंपरेनुसार इतर कार्यक्रम केले जाणार आहेत. रात्री ठीक १० वाजता देवीच्या मांडाचे पूजन करून मुख्य कार्यक्रम सुरू होणार आहे. देवीचा संचार दिवटी घेऊन मंदिर प्रदक्षिणा घालणार आहे.
त्यानंतर ओट्या भरण्याचा कार्यक्रम व महाप्रसाद होणार आहे. यानंतर संपूर्ण रात्रभर गोंधळ्यांकडून गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. यात कथा, देवीचे स्तवन याचा समावेश आहे. पहाटे काकड आरतीने गोंधळ उत्सवाची समाप्ती होणार आहे. तीनशे वर्षा पूर्वीची ही गोंधळ परंपरा आहे. हे एक जागृत देवस्थान आहे. भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आंबडोस गावचे सर्व मानकरी आणि परब बंधू यांच्याकडून करण्यात आले आहे.
फोटो:
