अँड.प्रकाश बोडस:डाॅ.शिरोडकर यांची 77 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न..
⚡देवगड ता.१८-: शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे कैलासवासी कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर हे एक थोर शिक्षणतज्ञ व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी उभारलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांमुळे समाजघडणीला मोठी दिशा मिळाली. त्यांचे शैक्षणिक कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अॅड प्रकाश बोडस यांनी केले.
मिठबाव येथील रामेश्वर हायस्कूल येथे कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्मृती कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष अॅड. प्रकाश बोडस, प्रमुख पाहुणे डॉ. संदीप लोकेगावकर, मार्गदर्शक व माजी कार्यकारी अधिकारी बी. एस. डगरे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी एम. के. लोके, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक चंद्रकांत लोके, माजी सभापती सुनील पारकर, सत्कारमूर्ती पत्रकार अयोध्याप्रसाद गावकर, सहाय्यक कार्यकारी अधिकारी व प्राचार्य भालचंद्र चव्हाण, उपसरपंच निवेदिता फाटक, मुख्याध्यापक आर. आर. राऊत, पोलीस पाटील संदीप हिंदलेकर, तंटामुक्ती अध्यक्ष पंडित पारकर (मिठबाव), संजय आचरेकर (कुणकेश्वर), माजी मुख्याध्यापक खाडिलकर, माजी पर्यवेक्षक राजेंद्र हिंदलेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच रामेश्वर हायस्कूल व वडील कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात प्रकाश बोडस पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधताना जिद्द, चिकाटी आणि स्पष्ट उद्दिष्टे मनाशी बाळगली पाहिजेत. आजचा विद्यार्थी हा उद्याच्या देशाचा सेवक असतो. गाव, राज्य आणि देशासाठी योगदान देण्याची तयारी शिक्षणातूनच घडते. समाजसेवेचे कोणतेही कार्य यशस्वी करायचे असल्यास त्याची सुरुवात शिक्षणातील प्रगतीपासूनच झाली पाहिजे. शिक्षणाची ताकद ओळखून अनेक शिक्षणतज्ञांनी शंभर वर्षांपूर्वी शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत. त्या परंपरेत कै. डॉ. शिरोडकर यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरले आहे. विद्यार्थ्यांनी सनदी अधिकारी बनण्याच्या दृष्टीने ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. संदीप लोकेगावकर व अयोध्याप्रसाद गावकर यांनीही कै. डॉ. शिरोडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आपले विचार मांडले. त्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोनामुळे ग्रामीण भागातील अनेक पिढ्यांचे जीवन घडले, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले. प्रास्ताविक बी. के. चव्हाण यांनी मांडले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक आर. आर. राऊत यांनी केले. कार्यक्रम शांत, सुसंस्कृत आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला
