कोलगाव गावाचा खऱ्या अर्थाने विकास पर्यटनाच्या माध्यमातून आजपासून सुरू झाला…

महेश सारंग: पर्यटन विकास व ग्रामसचिवालय इमारतीचं उत्साहात भूमिपूजन..

⚡सावंतवाडी ता.१८-:
कोलगाव गावाचा खऱ्या अर्थाने विकास पर्यटनाच्या माध्यमातून आजपासून सुरू झाला आहे. गावातील ग्रामदैवत सातारी व कलेश्वर या दोन्ही मंदिरांची नावे आता राज्याच्या पर्यटन नकाशावर नोंदली गेली असून, भविष्यात कोलगावमध्ये पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पर्यटन विकासामुळे स्थानिक महिला व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी केले.कोलगाव येथे पर्यटन विकास कामे व ग्रामसचिवालय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते.

सारंग म्हणाले की, प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी खर्च झाल्यानंतर या मंदिरांचे वैशिष्ट्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतील. मुंबई तसेच बाहेरगावाहून भाविक व पर्यटक दर्शनासाठी येणार असून, त्यामुळे परिसरात हॉटेल व्यवसाय व इतर पूरक रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, कोलगावच्या विकासासाठी एकूण १ कोटीचा निधी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता. मात्र निवडणुकीच्या काळात काही प्रशासकीय अडथळ्यांमुळे हा निधी रखडला. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज हा निधी प्रत्यक्षात आला आहे.

“विकासकामांसाठी निधी सहज मिळत नाही. यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. केवळ गावात किंवा तालुक्यात बसून विकास होत नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेतून आणखी १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी लवकरच मंजूर होणार असून, तो प्राप्त झाल्यास कोलगाव गावाचा विकास अधिक गतीने होईल, असेही महेश सारंग यांनी स्पष्ट केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ देवस्थान मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page