बागायती धोक्यात: पुन्हा आंदोलनाचा इशारा..
⚡बांदा ता.१४-: असनीये गावातील जीर्ण वीज वाहिन्या व विद्युत खांब बदलण्यासाठी ग्रामस्थांनी २२ जुलै रोजी केलेल्या आंदोलनानंतर ५० विजवाहिनी गाळे बसवणे व सर्व जुने विद्युत पोल बदलण्याचे आश्वासन महावितरण कडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही काम अर्धवट स्थितीत असून शेतीपंप बंद असल्याने बागायती करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. बागांना पाणी देता येत नसल्याने परिणामी या वर्षी नव्याने लावलेली झाडे मोठ्या प्रमाणात मरत आहेत. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असून पुन्हा एकदा स्थानिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचा इशारा असनीये सरपंच रेश्मा सावंत व ग्रामस्थ संदीप सावंत यांनी दिला आहे.
येथील काम शून्य गतीने सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. असनीये सरपंच रेश्मा सावंत व ग्रामस्थ संदिप सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, कार्यकारी अभियंता, उप अभियंता व बांदा शाखा अभियंता हे सर्व अधिकारी हात वर करून आपली जबाबदारीझटकत आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांसमोर प्रश्न उभा आहे की, पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल का? की पालकमंत्री व मंत्रालयात वीजमंत्र्यांची तातडीची भेट घेऊन थेट कारवाईची मागणी करावी लागणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
तात्काळ व लवकरात लवकर अपूर्ण काम पूर्ण करून बागांना पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रशासनाने आश्वासनांऐवजी तात्काळ कृती करावी, अशी ठाम मागणी स्थानिकातून होत आहे.
