नफ्याच्या आमिषाने कणकवलीतील महिलेची १२ लाख २७ हजारांची फसवणूक…

कणकवली : अल्पकाळात मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका ४० वर्षीय व्यक्तीने कणकवलीतील तरुणीची १२ लाख २७ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली विश्वास संपादन करून हा मोठा गंडा घालण्यात आला आहे. त्या महिलेच्या तक्रारीवरून संदीप अंकुश पाटील (४०, रा. राजारामपुरी- कोल्हापूर) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर २०२४ ते जून २०२५ दरम्यान घडली.

कुमारी शुभांगी अशोक मादनाईक (३८, रा. कलमठ गावडेवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मादनाईक यांच्या वडिलांचे ६ मार्च २०२३ रोजी निधन झाल्यानंतर, ऑगस्ट २०२३ मध्ये संदीप पाटील याने त्यांना फोन करून चौकशी केली. याच दरम्यान, मादनाईक यांनी आपल्या शेतजमिनीच्या विक्रीबाबत त्याला ग्राहक पाहण्यास सांगितले. वारंवार संपर्क साधून त्याने शुभांगी यांचा विश्वास संपादन केला. सप्टेंबर २०२४ मध्ये तो कणकवलीतील त्यांच्या घरी आला आणि आपण शेअर मार्केटचे प्रशिक्षण देण्यासोबतच स्वतः गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देऊ, असे आमिष दाखवले. त्यावेळी शुभांगी मदनाईक यांनी पाटील याला डिसेंबर २०२४ मध्ये ४५ हजार रुपये ट्रान्सफर केले.

मे २०२५ मध्ये मादनाईक यांच्या कुटुंबाने शेतजमीन विकली. त्यातून मिळालेले २० लाख रुपये शुभांगी यांनी बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेतील खात्यात जमा केले. ही माहिती त्यांनी संदीप पाटील याला दिली. त्यानंतर पाटील याने त्यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वारंवार पैसे मागण्यास सुरुवात केली. जमीन विक्रीनंतर १ लाख रुपये संदीप पाटील यांना दिले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी संदीप पाटील याला शुभांगी यांनी २ ते २४ जून २०२५ दरम्यान टप्याटप्याने ११ लाख १६ हजार रुपये हस्तांतरित केले. याप्रकारे, १८ डिसेंबर २०२४ ते २४ जून २०२५ या कालावधीत मादनाईक यांनी संदीप पाटील याच्या मोबाईल नंबरवर एकूण १२ लाख ६१ हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली. संदीप पाटील याने सुरुवातीला वेळोवेळी नफ्याचे कारण देत ३३ हजार २०० रुपये परत केले. मात्र, त्यानंतर उर्वरित रकमेची आणि गुंतवणुकीच्या स्थितीची विचारणा केली असता वेगवेगळी कारणे देत आणि हृदयविकाराच्या धक्क्याचा बहाणा करत टाळाटाळ सुरू केली. त्यावेळी शुभांगी यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. संदीप पाटील याने एकूण १२ लाख ६१ हजार रुपये घेतले आणि त्यातील केवळ ३३ हजार २०० रुपये परत केले. म्हणजेच, त्याने एकूण १२ लाख २७ हजार ८०० रुपये इतकी रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचे मादनाईक यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

You cannot copy content of this page