आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश..
⚡सावंतवाडी ता.१०-:
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील ‘ट्रेल हंटर्स’ ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथून थेट गोवा येथील मोरजीम बीचपर्यंत २१५ किलोमीटर अंतराची सायकल राईड यशस्वीरीत्या पूर्ण केली.
गुलाबी थंडी आणि बोचरा थंडगार वारा झेलत या साहसी सायकलपटूंनी पहाटे चार वाजता टोप येथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. टोप, कागल, गोवावेस, आजरा, गवसे, आंबोली, सावंतवाडी मार्गे त्यांनी मोरजीम बीच, गोवा असा २१५ किमीचा खडतर प्रवास अवघ्या १२ तास २० मिनिटांत पूर्ण केला. या राईडमध्ये पुणे येथून आलेल्या डॉ. रवींद्र काटकर यांनीही सहभाग घेऊन ती पूर्ण केली, हे विशेष.
’ट्रेल हंटर्स’ ग्रुप हा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वी त्यांनी आषाढी एकादशीला पेठ वडगाव ते पंढरपूर, तसेच पेठ वडगाव ते तारकर्ली, दांडेली, गणेश गुळे, कशेडी अशा अनेक सायकल राईड्स केल्या आहेत. तसेच, इंधन वाचविण्यासाठी आणि पेठवडगाव नगरपरिषदेच्या पर्यावरण जनजागृतीसाठीही त्यांच्या सायकल राईड्स आयोजित केल्या जातात.
गोवा फेरीत ट्रेल हंटर्स ग्रुपचे प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, तसेच डॉ. मिलिंद कुंभार, डॉ. रवींद्र काटकर, प्रमोद यादव, डॉ. सुनील महापुरे, डॉ. शशिकांत कुंभार, डॉ. उमेश खताळ, डॉ. महेश थोरात, केरबा पाटील, कृष्णात पाटील, नंदकुमार साळोखे, बाजीराव मिसाळ, वीरेंद्र चौगुले, संकेत घाटगे, पवन जंगम, राहुल पाटील, सिद्धार्थ डुनुग, मधुकर माळी, लक्ष्मण कुंभार, प्रदीप निकम, संजय कुशिरे, नितीन बोभाटे, ओंकार पाटोळे, योगेश खताळ आदी सदस्य सहभागी झाले होते.
या उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले की, “दररोज प्रत्येकाने किमान २० किमी सायकल चालविल्यास ते आरोग्यासाठी अत्यंत हितावह ठरते. सायकलिंगमुळे शरीराबरोबरच मेंदूतील नसा कार्यक्षम होतात, ज्यामुळे माणूस निरोगी राहतो. यामुळे आळस जाऊन संपूर्ण दिवस ताजातवाना राहतो आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.” ‘ट्रेल हंटर्स’ ग्रुपतर्फे दरवर्षी आरोग्य व पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
सायकल फेरीत महिला डॉक्टर सहभागी
ट्रेल हंटर्स सायकल ग्रुपमध्ये कोल्हापूर ते गोवा राईड साठी पेशाने डॉक्टर असलेल्या ग्रामीण भागातील डॉ. सुजाता कुंभार यांनी १०० कि. मी. सायकल चालवून इंधन बचाव बरोबर पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
फोटो –
पेठवडगाव येथील ट्रेल हंटर्स ग्रुपच्या सदस्यांनी टोप ते गोवा अशी २१५ कि. मी.ची राईड केली. या राईड मध्ये सहभागी सदस्य
