⚡मालवण ता.०९-:
कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर प्रशालेमध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. फायर ॲण्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबईचे ट्रेनर संजय मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रथमोपचार या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीकडे असावयास असणारे गुण, प्रथमोपचार करण्याचे उद्देश, बँडेजचे प्रकार व बँडेज बांधण्याच्या पद्धती, रक्त थांबवण्यासाठी जखमेवर करावयाचे प्रथमोपचार, फ्रॅक्चरचे प्रकार व फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तींना हाताळावयाच्या विविध पद्धती, त्वचा भाजल्यावर करावयाचे प्रथमोपचार, व्यक्तीला चक्कर आल्यावर किंवा बेशुद्ध पडल्यावर करावयाचे उपाय, हृदयविकाराचा झटका आल्यावर तातडीने करावयाचे उपचार व त्या व्यक्तीला सी. पी. आर. द्यावयाची पद्धती, साप, प्राणी अथवा कीटकांच्या दंशामुळे विषबाधा झाल्यास करावयाचे उपाय, विष प्रयोग झाल्यास करावयाचे उपाय, कोणतेही साधन नसताना जखमींना वाहून नेण्याच्या पद्धती इत्यादी विषयांवर मार्गदर्शक संजय मेस्त्री यांनी प्रात्यक्षिकांसह पी.पी.टी. व व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थी व शिक्षकही सहभागी झाले होते.
या शिबिरामुळे ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराबद्दल सखोल माहिती मिळून प्रशालेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी हे शिबिर लाभदायक ठरले. प्रथमोपचाराचे विना मोबदला प्रशिक्षण दिल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी मार्गदर्शक संजय मेस्त्री यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले.
या शिबिरासाठी प्रशालेचे विद्यार्थी तसेच शिक्षक ए.ए.शेर्लेकर, पी.के.राणे, एस.जे.सावंत, पी. आर पारकर, एस.पी.पवार, विजय नातू व शिक्षकेतर कर्मचारी आर.जे.जाधव, पी.व्ही.खोडके, एम.डी.परूळेकर आदी उपस्थित होते.
