कणकवलीत ‘मायाजाल’चे दोन विशेष शो…

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जादूगार जितेंद्र रघुवीर दाखल..

कणकवली : मनोरंजन आणि विज्ञानाचा संगम साधणारा ‘मायाजाल’ हा विक्रमी शो घेऊन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार जितेंद्र रघुवीर कणकवलीत दाखल झाले आहेत. रघुवीर कुटुंबाच्या चार पिढ्यांचा वारसा आणि तब्बल ८८ वर्षांच्या परंपरेने समृद्ध असलेल्या या शोमध्ये यंदा प्रथमच अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि थरारक जादूचे प्रयोग कणकवलीतील रसिकांसाठी सादर होणार आहेत.

या शोचे दोन विशेष प्रयोग शनिवार, ६ डिसेंबर रोजी सायं. ७ वाजता आणि रविवार, ७ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजता मराठा नाट्यमंदिर, कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी अप्पर डेक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संयोजक विकास पावसकर उपस्थित होते.

जितेंद्र रघुवीर म्हणाले की, नुकतेच इंडोनेशिया, युरोप, अमेरिका आणि सिंगापूर येथे गाजलेले अनेक प्रयोग यावेळी खास कणकवलीतील कलाप्रेमींसाठी सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये ९ फुटी जपानी डायनोसोर, तसेच तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला डेडपूल यांचाही समावेश आहे. भारतात प्रथमच जपानची ३ भुते, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, झू मिस्टरी मायाजाल आणि स्वतः रघुवीर यांची खास जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मायाजाल शोची खासियत म्हणजे केवळ करमणूक नसून विज्ञानाच्या आधारे सादर केलेले कौशल्यपूर्ण प्रयोग. यात नवीन पद्धतीने माणसाचे दोन तुकडे करून पुन्हा जोडणे, मायक्रोवेव्ह मॅजिक, नोटांचा पाऊस, फ्रेंच गिलोटीन, तसेच प्रेक्षकांतील व्यक्तीला क्षणार्धात हवेत अधांतरी ठेवणे यांसारखे थरारक प्रयोग प्रेक्षकांसमोर सादर होणार आहेत. आकर्षक वेशभूषा, सुमधुर संगीत आणि नेत्रदीपक लाइट्सच्या माध्यमातून ५० हून अधिक इजिप्शियन, अमेरिकन, जपानी आणि अरेबिक प्रयोगांची मेजवानी या शोमध्ये असेल.

जादूगार रघुवीर–विजय–जितेंद्र रघुवीर या पिता–पुत्रांचा हा विक्रमी १६१४३ वा आणि १६१४४ वा प्रयोग असून, गेल्या महिन्यात गोवा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि जळगाव येथे हाऊसफुल्ल शो संपन्न झाल्यानंतर आता कणकवलीत हा थरारक प्रयोग होणार आहे.

१९३८ पासून रंगभूमीवर योगदान देणाऱ्या रघुवीर परिवाराला गेल्या वर्षी पुरुषोत्तम पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार तसेच अमेरिकन नेव्ही, युनायटेड नेशन्स आणि अखिल मराठी नाट्यपरिषदेचा विशेष सन्मान प्राप्त झाला आहे.

संयोजक विकास पावसकर यांनी सर्व जिल्हावासीयांना “हा संपूर्ण कुटुंबासाठी १००% मनोरंजन देणारा ब्लॉकबस्टर मॅजिक शो असून, बालगोपाल, पालक आणि आजी – आजोबांसह उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page