⚡ओरोस ता.०५-: सिंधुदुर्गनगरी येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात कोंकणी अर्क असलेला रत्नांग्रीचा अंतू बर्वा, पुण्याचा लग्नमंडपात रमलेला नारायण, परोपकारी गंपू आणि साहित्यात अति घुसमटलेला सखाराम गटणे या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील वल्ली थोड्या काळासाठी अवतरल्या होत्या. निमित्त होते ‘आम्ही साहित्यप्रेमी’ ने आयोजित केलेल्या पु.ल.कित उत्सव या कार्यक्रमाचे. या अजरामर व्यक्तिरेखा आणि पु.लं.नी संगीत दिलेली काही गाणी यात रसिक रंगून गेले.
‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ दिवंगत पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित हा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्गनगरी येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक गौतमी महाजन यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या व्यासपीठाचा हा नववा कार्यक्रम होता.
या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील काही वल्ली सादर करण्यात आल्या. सतीश लळीत यांनी अंतू बर्वा त्याच्या सानुनासिक हेलीसकट उभा केला. डॉ. सई लळीत यांनी परोपकारी गंपू तर वैदेही आरोंदेकर यांनी लग्नाच्या मंडपातील नारायण सादर केला. ॲड. सुधीर गोठणकर यांनी सखाराम गटणे ही वल्ली सादर केली.
पुरुषोत्तम लाडू कदम यांनी पुणे येथे भेटलेले ‘पु.ल.’ यावर अनुभवकथन केले. याबरोबरच नम्रता रासम यांनी पु.लं.नी अनेक गीताना दिलेले संगीत यावर विवेचन केले. यावेळी प्रगती पाताडे (मीपणा), प्रिया आजगावकर (माझे जीवन गाणे), मेघना उपानेकर (शब्दांवाचून कळले सारे), सीमा मसुरेकर, सुधीर गोठणकर व मनोहर सरमळकर यांनी पु.लं.नी संगीत दिलेली गाणी सादर केली. श्री. अनिल रेडकर यांनी पु.लं.नी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांबद्दल माहिती दिली. हा कार्यक्रम दीड तासाहून अधिक वेळ रंगला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पु. ल. देशपांडे यांनी १९८९ साली मुंबई येथील जागतिक मराठी परिषदेच्या संमेलनात केलेल्या प्रसिद्ध भाषणाची ध्वनिफीत ऐकवण्यात आली. व्यासपीठाचा दहावा मासिक कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे.
फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:
