सिंधुदुर्ग किल्ल्यात ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ गड मोहीम संपन्न…

⚡मालवण ता.०५-:
मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ ही गड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्याची स्वच्छता, श्री भवानी देवीचा नामजप, गड भ्रमंती, स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून बलोपासना करण्यात आली.

यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यामधील श्री शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री भवानी माता यांच्या चरणी पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करून मोहिमेला प्रारंभ केला. यावेळी किल्ल्यावरील पाला पाचोळा, प्लास्टिक कचरा, गवत काढून काटेरी झाडी तोडण्यात आल्या. या मोहिमेला जिल्ह्यातील ५० शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. उपस्थित सर्वांनी श्री भवानी देवीचा भावपूर्ण नामजप केला.

उपस्थित सर्व शिवप्रेमींना गडावरील स्थानिक शिवप्रेमी हितेश वायंगणकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला. श्री शिवराजेश्वर मंदिराचे अध्यक्ष आणि मुख्य पुजारी श्री. सयाजी सकपाळ यांचे उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. उत्तम प्रकारे स्वच्छता केल्याबद्दल सिंधुदुर्ग किल्ल्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी समितीच्या या उपक्रमाबद्दल खूप कौतुक केले.

You cannot copy content of this page