वेतन कमी केल्यावरून महावितरणचे कंत्राटी कामगार एकवटले…

कामाचे तास, अधिकाऱ्यांची मनमानी याबाबत कंत्रादारांकडे वाचला पाढा:आठ दिवसात निर्णय देण्याची कंत्राटदारांची ग्वाही..

⚡कुडाळ ता.०४-: महावितरणचे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांचे वेतन कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही संघटना किंवा राजकीय सहकार्य न घेता या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी हे कंत्राटी कामगार एकत्र आले आहेत. याबाबत कुडाळ विभागातील कंत्राटी कामगार आणि कंत्राटदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आज कामगार भवन, पिंगुळी येथे झाली. या बैठकीमध्ये वेतन किंवा इतर मागण्यांबाबत काही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आठ दिवस वाट पाहण्याची भूमिका कंत्राटी कामगारांनी घेतली आहे.
महावितरणचे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांची आज पिंगुळी येथील कामगार भवन येथे बैठक झाली. या बैठकीला कुडाळ विभागातील सुमारे शंभर कंत्राटी कामगार आणि कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते. गणेश पूजनाने या बैठकीला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर प्रसाद चव्हाण, दिनेश राऊळ, लक्ष्मण नांदोसकर, विजय येरम तसेच कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी समाधान चव्हाण, महेश पाटील, शौकत शेख उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना या कंत्राटी कामगारांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. कंत्राटी कामगार प्रसाद चव्हाण म्हणाले, कंत्राटी कामगारांचे वेतन जे २४ हजार ते २१ हजार होते ते अचानक सुरुवातीला १९ हजार आणि नंतर १६ हजार ५०० पर्यंत कमी करण्यात आले आहे. या संदर्भात हे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार एकत्र आले आहेत. कोणत्याही संघटना अगर राजकीय यांचे सहकार्य न घेता फक्त कंत्राटी कामगार म्हणून सगळे एकत्र आले आहेत. इएसआय, पीपीएफ, कामाचे स्वरुप, कामाची वेळ याबाबतरही कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येणार आहे. जे काम ठरवून देण्यात आले आहे त्या व्यतिरिक्त कंत्राटी कामगार काम करत आहेत. ८ तासांची ड्युटी असताना २४-२४ तास आम्हाला राबवून घेतले जात आहे. दोन महिन्यापासून आम्हाला आमचे वेतन कमी दिले जात आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आम्ही संपात उतरू शकतो. जिल्हयात एकूण पाच कंत्राटदार कंपन्या आहेत. त्यापैकी कुडाळ विभागात जी.ए. डिजिटल, महारुद्र सिस्टीम, साई स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था नाशिक अशा तीन कंत्राटदार संस्था आहेत. असे प्रसाद चव्हाण यांनी सांगितले.
दिनेश राऊळ म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची पिळवणूक चालली आहे. आठ तासाची ड्युटी केली तरी वरिष्ठांचे नेहमी अधिक काम करण्याबाबत फोन येतात. नाही ऐकले तर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्या विरोधात न्याय मागण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्याच बरोबर आम्हाला मिळणाऱ्या वेतनात सुद्धा कपात केली आहे. जिल्ह्यात कंत्राटी कामगारांचे पाच अपघात झाले. पण महावितरणने आजपरण्यात त्याची शहानिशा केलेली नाही. सेफ्टीकिट सुद्धा कंत्राटदारांनी हल्ली पर्यंत दिली नव्हती. काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने हॅन्डग्लोव्ज आणि पक्कड दिली, पण ती सुद्धा निकृष्ट दर्जाची, असा आरोप करण्यात आला. अधिकाऱ्यांचा कॉल येतो तेव्हा रात्री अपरात्री कंत्राटी कामगार अधिकाऱ्याच्या भीतीपोटी कामाला धावतो. पण काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी महावितरणचे अधिकारी घेत नाहीत. कुशल कामगार म्हणून आमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आम्ही पोलवर चढून काम करण्यास बांधील नाही, ११ केव्ही, ३३ केव्ही लाईन वर करण्यास आम्ही बांधील नाही असे आमची वर्कऑर्डर सांगते. पण अधिकाऱ्यांकडून याची अंमलबजावणी केली जात नाही आणि आम्हाला नाईलाजाने ११ केव्ही, ३३ केव्ही वर काम करावे लागते.
लक्ष्मण नांदोसकर म्हणाले, दिले जाणारे वेतन कमी, कामाची वेळ अनियमित आणि वरिष्ठांकडून होणारा छळ याविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. याबाबत चर्चा करण्यासाठी कंत्राटदारांना वेळ देऊन सुद्धा ते वेळेत येत नाहीत, हे दुर्दैवी आहे. राजकीय प्रतिनिधी आम्हाला मदत करत होते, काही कामगार संघटना मदत करत होत्या पण आमचे प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळे आम्ही स्वतःच आमच्यावरील अन्यायाविरोधात एकत्र आलो आहोत. यापुढे संघटनेच्या कुबड्या घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान कंत्राटदारांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. पण त्यातून ठोस काही मार्ग निघाला नाही. कंत्राटदारांच्या प्रतिनिधींनी आठ दिवसांची मुदत वेतन, कामाचे स्वरूप यासाठी मागून घेतली. त्यामुळे तूर्तास तरी आठ दिवस थांबण्याचा निर्णय बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांनी घेतला आहे. बैठकीचे सूत्रसंचालन लक्ष्मण नांदोसकर यांनी केले. यावेळी कुडाळ विभागातील दहा सेक्शनचे कंत्राटी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page