मालवणात मतपेट्या ठेवलेला स्ट्रॉंगरूमच स्ट्रॉंग नाही ; उमेदवारांचा आरोप…

उबाठा व शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांची रात्री नगरपालिकेत धडक..

⚡मालवण ता.०३-: मालवण शहरात काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या मालवण नगरपालिकेतील स्ट्रॉंग रूम मध्ये आणून ठेवल्यानंतर रात्री उबाठा शिवसेना व शिंदे शिवसेना उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत दाखल होत सदर स्ट्रॉंग रूम योग्य नसल्याचा आरोप करत मतपेट्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्ट्रॉंग रूमचा दरवाजाच कमजोर असून मतमोजणी पुढे ढकलल्याने २१ तारीख पर्यंत मतपेट्या सुरक्षित राहणारं का ? असा सवाल उपस्थितानी करत दरवाजा चांगला लावण्यात यावा, पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा, तसेच स्ट्रॉंगरूम मध्ये लावलेल्या सीसीटीव्हीचे प्रक्षेपण पाहण्यासाठी नगरपालिकेच्या प्रवेश हॉल मध्ये स्क्रीन लावून उमेदवार व प्रतिनिधी यांनाही स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.

दरम्यान, मतपेट्यांसाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आळा असून मागणीनुसार अधिक सुरक्षेसाठी पोलीस विभागाशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी काल शांततेत मतदान पार पडले. मतदानानंतर सर्व केंद्रावरील इव्हीएम मशीन पेट्यांमध्ये भरुन पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेतील स्ट्रॉंग रूम मध्ये आणून ठेवल्या गेल्या. याबाबतची कार्यवाही रात्री पर्यंत सुरु होती. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत धाव घेत स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त केले. सदर स्ट्रॉंग रूमचा दरवाजा प्लायवूडचा असून तो हलत आहे, त्याला कुलूप देखील छोटेसे लावण्यात आले आहे, असे यावेळी उपस्थित उमेदवारांनी सांगितले. तसेच निवडणूक मतमोजणी पुढे ढकलून २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे इतके दिवस असा दरवाजा असणाऱ्या स्ट्रॉंग रूम मध्ये मतपेट्या सुरक्षित राहणार का ? कोर्टाने मतमोजणी पुढे ढकलली हेच मुळात चुकीचे आहे, इतक्या वर्षात नगरपालिका निवडणुकीत असे कधीच झाले नव्हते, आमचे भवितव्य त्या मतपेट्यांमध्ये आहे, मत मोजणीला अजुन १९ दिवस बाकी असून अशा स्ट्रॉंगरूम मध्ये प्रशासन मतपेट्या ठेवणार आहे का? स्ट्रॉंग रूम मध्ये लावलेल्या सीसीटीव्हीचे प्रक्षेपण आम्हालाही दिसलें पाहिजे, आत काय चालले आहे हे आम्हालाही कळले पाहिजे असे उमेदवार व कार्यकर्त्यांनी सांगत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी नगरपालिकेत दाखल होत उपस्थितांशी चर्चा केली.

यानंतर उमेदवारांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. स्ट्रॉंग रूमचां दरवाजा चांगला लावण्यात यावा, पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा, तसेच स्ट्रॉंगरूम मध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे प्रक्षेपण पाहण्यासाठी नगरपालिकेच्या प्रवेश हॉल मध्ये स्क्रीन लावण्यात यावी आणि त्याद्वारे उमेदवार व प्रतिनिधी यांनाही स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवण्याची परवानगी मिळावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आली. याबाबत पोलीस विभागाशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. पाटील यांनी दिले.

You cannot copy content of this page